कायमस्वरूपी डॉक्टरांअभावी रुग्णांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:18 IST2021-04-20T04:18:06+5:302021-04-20T04:18:06+5:30

येलदरी : जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३४ हून अधिक गावांतील ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. मात्र ...

Patients without permanent doctors | कायमस्वरूपी डॉक्टरांअभावी रुग्णांचे हाल

कायमस्वरूपी डॉक्टरांअभावी रुग्णांचे हाल

येलदरी : जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३४ हून अधिक गावांतील ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. मात्र मागील काही दिवसांपासून या ठिकाणी कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. मात्र जिल्हा आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.

जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या ३४ गावांतील ५० हजार ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी २८ डॉक्टर व कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. दोन महिन्यांपूर्वी या प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून योग्य ते उपचार केले जात होते. मात्र मागील दोन महिन्यांपासून येथील कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्यांना निलंबित करून शासनाकडे त्यांची शिफारस पाठविण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नाही. या आरोग्य केंद्राचा कारभार उपकेंद्रातील डॉक्टरांकडे देण्यात आला आहे. त्यामुळे हे डॉक्टर अपडाऊन करत आहेत. परिणामी रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टर प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देण्यासाठी येतात; मात्र त्यात नियमितता राहत नसल्याने रुग्णांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर एकीकडे राज्य शासन आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्यासाठी विविध पावले उचलत आहे; मात्र दुसरीकडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील दोन महिन्यांपासून वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. याकडे जिल्हा आरोग्य विभागाने लक्ष देऊन या आरोग्य केंद्राला कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

आरोग्य केंद्राची इमारतही मोडकळीस

येलदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत मोडकळीस आल्यामुळे या रुग्णालयाचे कामकाज एकाच खोलीत चालविले जात आहे. विशेष म्हणजे कोरोना रुग्ण आणि इतर रुग्णांवर एकाच ठिकाणी उपचार करण्यात येत असल्याने कोरोना विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे रुग्णांवर उपचार करताना या केंद्रातील आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकाऱ्यांसह मोडकळीस आलेल्या इमारतीचा प्रश्नही मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Patients without permanent doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.