सुविधांअभावी जिंतूरातील रुग्णांचे जिल्हास्तरावर पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:15 IST2021-04-19T04:15:18+5:302021-04-19T04:15:18+5:30

जिंतूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज ५० ते ६० रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. त्यामुळे उपचारासाठी ...

Patients from Jintura flee to district level due to lack of facilities | सुविधांअभावी जिंतूरातील रुग्णांचे जिल्हास्तरावर पलायन

सुविधांअभावी जिंतूरातील रुग्णांचे जिल्हास्तरावर पलायन

जिंतूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज ५० ते ६० रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. त्यामुळे उपचारासाठी रुग्णांची धावपळ होत आहे. शहरामध्ये अल्पसंख्याक विद्यार्थी वसतिगृहात कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. ज्या रुग्णांना लक्षणे नाहीत, अशा रुग्णांसाठी या सेंटरचा उपयोग होत आहे. परंतु, परिस्थिती वेगळी आहे. तालुक्‍यातील ज्या रुग्णांचे वय ५० वर्षांहून अधिक आहे. अशा रुग्णांना तत्काळ ऑक्सिजनची गरज असते. ऑक्सिजन, तज्ज्ञ डॉक्टर मंडळींची सेवा मिळाली तर हे रुग्ण जिल्हास्तरावर जाणार नाहीत. जिल्हास्तरावर लोकांचा वाढता वेगही कमी होईल. परंतु, प्राथमिक सुविधा तसेच रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिंतूर शहरातील कोविड सेंटरमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची उणीव आहे. याउलट डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा कार्यक्षमतेने वापर करून घेण्यासाठी आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे जिंतूर येथे कोरोना पॉझिटिव्ह आलेले अनेक रुग्ण शहरात उपचार घेणे टाळत आहेत. हे रुग्ण जिल्हास्तरावर व इतर जिल्ह्यांमध्ये जाऊन उपचार घेत असल्याचे चित्र जिंतूर तालुक्यात दिसून येत आहे. तालुक्यातील जवळपास २५० ते ३०० रुग्ण जालना येथे उपचार घेत असून, काहींनी नांदेड जवळ केले आहे. २०० पेक्षा जास्त रुग्ण परभणीत उपचार घेत आहेत. परभणी येथील कोविड सेंटरमध्ये जास्त सुविधा आहेत. त्याच जिंतूर येथील कोविड सेंटरमध्ये मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. स्थानिक प्रशासन याकडे फारसे लक्ष देत नाही. परिणामी येथील ग्रामीण रुग्णालयात १२ ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु, ही सुविधा अत्यंत अपुरी आहे. ही संख्या ५० पर्यंत वाढवणे गरजेचे आहे. सध्या जिंतूरमध्ये ५ तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी आहेत. ३ आयुष्यअंतर्गत काम करणारे वैद्यकीय अधिकारी आहेत. याशिवाय २ डॉक्टर सेवार्थ म्हणून काम करतात. या डॉक्टरांचा पुरेपूर वापर करून घेतला जात नाही. सर्व डॉक्टरांना दररोज आठ तास ड्युटी दिली, तर १०० खाटांचे चांगले रुग्णालय चालू शकते.

आमदारांनी साधला जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद

जिंतूर शहरात तज्ज्ञ डॉक्टर व ऑक्सिजनची पुरेशी सुविधा द्यावी, यासाठी आ. मेघना बोर्डीकर यांनी दूरध्वनीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी २ दिवसात ५० ऑक्सिजनचे बेड देण्याचे आश्वासन दिले. याशिवाय २ तज्ज्ञ डॉक्टरांनाही जिंतूर येथे नियुक्त करून काही खासगी डॉक्टरांची मदत घेऊ, असे सांगितले. त्यामुळे जिंतूर येथे आता अद्ययावत सुविधा करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने कार्यक्षमतेने काम करणे गरजेचे आहे.

त्या तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती रद्द करा

जिंतूर ग्रामीण रुग्णालयातील डॉ. अनिल गरड, डॉ. शिवाजी हरकळ या तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची मागील एक वर्षापासून जिल्हा रुग्णालयात प्रतिनियुक्ती करण्यात आले आहे. रुग्ण संख्या वाढत असताना चांगले वैद्यकीय अधिकारी परभणीला प्रतिनियुक्तीवर जात असतील तर जिंतूर येथील कोविड सेंटर चालणार तरी कसे? त्यामुळे या प्रतिनियुक्त्या तत्काळ रद्द करून जिंतूर रुग्णालयाला एक्स-रे तंत्रज्ञ तत्काळ देणे गरजेचे आहे.

आता वैद्यकीय अधीक्षकही आले पॉझिटिव्ह

एकीकडे जिंतूर शहरातील रुग्णांची संख्या वाढत असताना येथील वैद्यकीय अधीक्षक पॉझिटिव्ह आल्याने अडचणीत आणखीनच भर पडली आहे. शनिवारी जिंतूर शहर व ग्रामीण भागातील ३४ व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत. दिवसेंदिवस संख्या वाढत असताना काळजी घेणे, हाच पर्याय आता सध्या तरी समोर दिसत आहे.

Web Title: Patients from Jintura flee to district level due to lack of facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.