परभणीचे तापमान ५.७ अंश की १०.५ अंश? दोन ठिकाणी भिन्न नोंदी, पण हुडहुडी कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 16:45 IST2025-12-11T16:40:51+5:302025-12-11T16:45:02+5:30
कृषी विद्यापीठ नोंदीनुसार किमान तापमान ५.७ तर आयएमडीचे तापमान १०.५ अंश सेल्सिअस

परभणीचे तापमान ५.७ अंश की १०.५ अंश? दोन ठिकाणी भिन्न नोंदी, पण हुडहुडी कायम
परभणी : किमान आणि कमाल तापमान मोजण्याची यंत्रणा दोन ठिकाणी उपलब्ध असल्याने परभणीची वेगळी ओळख बनली आहे. ही बाब अनेकांसाठी आश्चर्यकारक आहे. यातच उभारलेली ही दोन ठिकाणची यंत्रणा वेगवेगळ्या भागात असल्याने तेथील तापमानाच्या नोंदीत ही मोठी तफावत आढळून येते. असे असले तरी सध्या किमान तापमानात झालेल्या घटमुळे परभणीकरांना हुडहुडी कायमच आहे.
यामध्ये हिरवी झाडी आणि निसर्गरम्य परिसर असलेल्या कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयित कृषी हवामानशास्त्र संशोधन प्रकल्प नोंदीनुसार परभणीचे तापमान तीन दिवसांपासून पाच ते सहा अंशा दरम्यान नोंद होत आहे. दुसरीकडे आयएमडीच्या मोजमाप यंत्रणेत हेच तापमान बुधवारी १०.५ अंश सेल्सिअस नोंद झाले आहे. परभणी शहराला लागून असलेल्या काळी कमान भागात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा परिसर सुरू होतो. या परिसरातील विविध भागात विद्यापीठातील संशोधन प्रकल्प, शेतीशी निगडित विभाग आणि महाविद्यालये, प्रशासकीय इमारत असा भाग आहे. याच परिसरात साधारण चार किलोमीटर अंतरावर ग्रामीण कृषी मौसम सेवा अंतर्गत विद्यापीठ हवामानशास्त्र संशोधन प्रकल्पाचा परिसर आहे. तेथे वर्षभरात विविध ऋतूमध्ये होणाऱ्या निसर्गचक्रातून पाऊस, कमाल किमान तापमान, आर्द्रता यासह विविध प्रकारच्या नोंदी घेतल्या जातात. संपूर्ण हिरवळीचा आणि प्रदूषणविरहित असलेल्या या परिसरातील विभागाकडून घेण्यात येणाऱ्या नोंदीनुसार सध्या परभणी शहर परिसरातील तापमानात मोठी घट झाली आहे. बुधवारी किमान तापमान ५.७ अंश नोंदविले. दुसरीकडे मुख्य रहिवासी आणि बाजारपेठ, वर्दळीच्या भागात सार्वजनिक बांधकाम विभाग परिसरात आयएमडीची तापमान मोजमाप यंत्रणा कार्यरत आहे. येथील नोंदीनुसार बुधवारी किमान तापमान १०.५ अंश सेल्सिअस नोंद झाले होते.
मोजमापाची वेळ एकच
विद्यापीठ परिसरातील हवामानशास्त्र विभागाकडून दररोज सकाळी ७ वाजून २३ मिनिटांनी ही किमान तापमानाची नोंद घेतली जाते. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या सर्वत्र लागू असलेल्या नियमाप्रमाणे एकाच वेळी ही नोंद घेतली जाते. शहरातील प्रदूषण, हवेतील बदल, वाहनांची वर्दळ आणि अन्य कारणांनी विद्यापीठ भागातील हिरवळ, निसर्गरम्य परिसरामुळे दोन्ही तापमानात नोंदीत तफावत असते, अशी माहिती हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डाॅ. कैलास डाखोरे यांनी दिली.
आयएमडीची फोरकास्ट ऑब्झर्वेटरी
शनिवार बाजारातील सार्वजनिक बांधकाम विभाग परिसरातील आयएमडीची नोंद घेणारी यंत्रणा ही फोरकास्ट ऑब्झर्वेटरी आहे. शहरातील तापमान हे प्रदूषण तसेच इमारती याशिवाय विविध बाबींमुळे विद्यापीठातील परिसरापेक्षा अधिक असते, अशी माहिती आयएमडीचे हवामान शास्त्रज्ञ संजय दांडगे यांनी दिली.