परभणीकरांचा भंगार बसेसमधून जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 04:02 PM2019-12-05T16:02:17+5:302019-12-05T16:05:13+5:30

परभणी आगारातील निम्म्यापेक्षा अधिक बसेसची बिकट अवस्था झाली आहे.

Parbhanikar's life-threatening journey through wreck buses | परभणीकरांचा भंगार बसेसमधून जीवघेणा प्रवास

परभणीकरांचा भंगार बसेसमधून जीवघेणा प्रवास

Next

- मारोती जुंबडे

परभणी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या परभणी आगारातील निम्म्यापेक्षा अधिक बसेसची बिकट अवस्था झाली आहे. या बसेस भंगारमध्ये टाकण्याच्या लायकीच्या असतानाही रस्त्यांवरुन धावत असल्याने प्रवाशांना जिवघेणा प्रवास करावा लागत आहे.  

‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रिद घेवून प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभागीय कार्यालय परभणी शहरात आहे़ या कार्यालयांतर्गत परभणी जिल्ह्यातील ४ व हिंगोली जिल्ह्यातील ३ अशा एकूण ७ आगारांचा कारभार चालतो़ परभणी आगारातून दररोज ६६ बसेस धावतात़ दिवसगणिक ३७२ फेऱ्यांमधून हजारो प्रवाशांची ने-आण केली जाते. त्यातून कधी तोटा तर कधी नफा परभणी आगाराला मिळतो़ यासाठी १३३ बसचालक व १५४ वाहकही कार्यरत आहेत़ परभणी आगारात असणाऱ्या बहुतांश बसेस मोडकळीस आलेल्या आहेत़ त्यांचे इंजिनही बीएस-२, बीएस-३ व बीएस-४ या प्रकारचे आहेत़ मागील काही दिवसांपासून परभणी आगाराच्या कारभाराबद्दल प्रवाशांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे़ 

सध्या तर ग्रामीण भागात या आगारातून धावणाऱ्या बहुतांश बसेसच्या काचा फुटलेल्या आहेत़ आसन व्यवस्थेवर धूळ चढलेली आहे़ बसच्या समोरील इंजिनचा भाग उघडा पडला आहे़ तर काही बसेसचा पाठीमागील भागच गायब असल्याचे सोमवारी केलेल्या पाहणीतून दिसून आले़ त्यामुळे पैसे भरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एसटी महामंडळाकडून मात्र सुविधा देण्यासाठी आखडता हात घेतला जात असल्याचे दिसून येते़ बसच्या दुरवस्थेमुळे अनेक प्रवाशांना गैरसोयींचा सामनाही करावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत़ दररोज दोन-तीन बसेस दुरुस्तीसाठी आगारातील वर्कशॉपमध्ये कामासाठी असतात़ 

अनेक वेळा दुरुस्ती न करताच बसेस प्रत्यक्ष मार्गावरुन चालविल्या जातात. त्यामुळे प्रवाशांनाही जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. ग्रामीण भागात गेलेली बस रस्त्यामध्येच नादुरुस्त झाली तर दिवसभर चालक-वाहकाला एकाच ठिकाणी बसून राहावे लागते़ याचा फटका प्रवाशांना बसतो. परभणी आगाराच्या प्रशासनाने लक्ष देऊन प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी चांगल्या बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे़ 

एक वर्ष तरी भंगार बसमधूनच करावा लागणार प्रवास
एसटी महामंडळाच्या परभणी आगारात ६६ बसेस असून या सर्व बसेस बीएस-२ ते बीएस-४ इंजिनच्या आहेत़ त्यामुळे यातून प्रदूषणात वाढ होत असल्याचे वरिष्ठ अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले़ त्यामुळे या इंजिनच्या बस बंद करून आता बीएस-६ इंजिनच्या बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी चर्चा वरिष्ठ स्तरावर झालेल्या एका बैठकीत करण्यात आली आहे़ त्यामुळे जोपर्यंत बीएस-६ इंजिनच्या बसेस उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत प्रवाशांतून या भंगार बसेसमधून प्रवास करावा लागणार आहे. आगार प्रशासनाही नवीन बस कधी दाखल होतात, याची प्रतीक्षा करीत आहे.

प्रथमोपचार पेटी व अग्नीशमन गायब
एसटी महामंडळाच्या परभणी आगारातून ६६ बसेस धावतात़ एका बसमधून कधी ४५-५० प्रवासी प्रवास करतात़ प्रवास करीत असताना एखादी अनुचित घटना घडली आणि त्यामध्ये एखादा प्रवासी जखमी झाला तर तत्काळ बसमध्येच प्रथमोपचार मिळावा, यासाठी एसटी महामंडळ प्रशासनाने हजारो रुपयांचा खर्च करीत प्रथमोपचार पेटी सर्व बसेसमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत़ सोमवारी केलेल्या पाहणीमध्ये ठराविक एक-दोन बसेसमध्येच प्रथमोपचार पेटी आढळून आली़ त्याचबरोबर अग्नीशमन यंत्रणाही गायब असल्याचे दिसून आले़ त्यामुळे केवळ प्रवाशांकडून पैसे वसूल करायचे; परंतु, सोयी-सुविधा व सुरक्षिततेकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करायचे. याबाबत या विभागाच्या अधिकाऱ्यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

बसेसच्या स्वच्छतेकडेही आगार प्रशासनाचे दुर्लक्ष
दिवसभर प्रवाशांची ने-आण करून बस आगारात आल्यानंतर पाण्याने ती स्वच्छ करण्याची जबाबदारी एका खाजगी एजन्सीला एसटी महामंडळाकडून देण्यात आली़ या खाजगी एजन्सीतील कर्मचारी केवळ बसेसवर पाणी मारून मोकळे होतात; परंतु, आतमध्ये आसन व्यवस्थेवर साचलेली धूळ, प्रवाशांनी केलेली घाण साफ करण्याकडे मात्र ही एजन्सी दुर्लक्ष करीत असल्याचे सोमवारी केलेल्या पाहणीतून दिसून आले़ त्यामुळे बाहेरून दिखावा आतून बंडाळी होत असल्याचे पहावयास मिळाले़ 

Web Title: Parbhanikar's life-threatening journey through wreck buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.