परभणीकरांना अर्धा तास पावसाने झोडपले
By राजन मगरुळकर | Updated: October 1, 2022 16:31 IST2022-10-01T16:31:01+5:302022-10-01T16:31:11+5:30
शहरात सकाळपासून शहर परिसरातील वातावरणात बदल झाला होता

परभणीकरांना अर्धा तास पावसाने झोडपले
परभणी : शहर परिसरात शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सुरवातीला दहा ते पंधरा मिनिटे रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यानंतर पुन्हा काही वेळाच्या खंडाने जवळपास अर्धा तास पाऊस झाला. या कालावधीत झालेल्या जोरदार पावसाने परभणीकरांना चांगलेच झोडपले.
शहरात सकाळपासून शहर परिसरातील वातावरणात बदल झाला होता. शुक्रवारी रात्रीही काही वेळ पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान, दोन दिवसांपासून अधूनमधून पाऊस होत असल्याने उकाड्यातही वाढ होत आहे. या पावसाने शहरातील रस्ते जलमय झाले होते. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची धांदल उडाली.
मागील आठवड्यात ४७ मिमी पाऊस
शहर परिसरात गेल्या आठवड्यात ४७.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राने घेतलेल्या नोंदीनुसार २४ ते ३० सप्टेंबरदरम्यान ४७.४ मिमी पाऊस झाला. यात गुरुवारी सर्वाधिक पाऊस झाला आहे. आतापर्यंत १ जूनपासून ८९६.६ मिमी पाऊस झाला आहे.