परभणी:जलस्त्रोत आटल्याने ग्रामीण भागात टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 23:59 IST2019-07-28T23:59:03+5:302019-07-28T23:59:29+5:30
यंदाच्या पावसाळी हंगामात तालुक्यात एकही मोठा पाऊस झाला नसल्याने ग्रामीण भागातील जलस्त्रोत आटलेलेच असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

परभणी:जलस्त्रोत आटल्याने ग्रामीण भागात टंचाई
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी): यंदाच्या पावसाळी हंगामात तालुक्यात एकही मोठा पाऊस झाला नसल्याने ग्रामीण भागातील जलस्त्रोत आटलेलेच असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
पूर्णा तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने तालुक्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे़ संपूर्ण पावसाळी हंगामात मोठा पाऊस झाला नाही़ त्यामुळे भूजल पातळीतही वाढ झाली नसून ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे़
पूर्णा शहराला पूर्णा येथील बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो़ उन्हाळ्यात या बंधाºयातील पाणी आटल्याने शहरवासियांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते़ पावसाळ्यात पूर्णा नदीचे पाणी बंधाºयात साचेल, अशी अपेक्षा होती़ मात्र दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरीही पूर्णा नदीला पुरेशे पाणी आले नाही़ परिणामी बंधाºयातही पाणीसाठा झाला नाही़ उन्हाळ्यामध्ये पुर्णेकरांसाठी सिद्धेश्वर प्रकल्प आणि निम्न दूधना प्रकल्पातून पाणी घेतले होते़ हा पाणीसाठा जुलै महिन्यापर्यंत पुरविण्यात आला़ परंतु, आता मात्र बंधाºयातील पाणीसाठाही कमी झाला असून, आगामी काळात मोठा पाऊस झाला नाही तर शहरवासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे़
दरम्यान, पूर्णा नगरपालिकेने उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्याच्या हेतुने शहराला आठ दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा सुरू केला आहे़ ज्या भागात नळ योजना आहेत त्या ठिकाणी किमान आठ दिवसांना पाणी मिळते़ परंतु, नवीन वसाहतींमध्ये नळ योजना नसल्याने भर पावसाळ्यात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ या भागातील हातपंपांना अजूनही पाणी आले नाही़ परिणामी नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ शहराबरोबरच ग्रामीण भागातही उन्हाळ्यात निर्माण झालेली पाणी टंचाई कायम असल्याचे दिसत आहे.