परभणीचे तापमान ३४.५ अंशांवर : कूलर, पंख्यांचा वापर वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:37 IST2018-10-03T00:36:06+5:302018-10-03T00:37:20+5:30
वातावरणातील बदलामुळे पंधरा दिवसांपासून परभणीकर नागरिक हैराण झाले आहेत. वातावरणातील उकाडा दिवसेंदिवस वाढत असून, भर पावसाळ्यात नागरिक उन्हाळ्यासारखा असह्य उकाड्याचा अनुभव घेत आहेत.

परभणीचे तापमान ३४.५ अंशांवर : कूलर, पंख्यांचा वापर वाढला
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : वातावरणातील बदलामुळे पंधरा दिवसांपासून परभणीकर नागरिक हैराण झाले आहेत. वातावरणातील उकाडा दिवसेंदिवस वाढत असून, भर पावसाळ्यात नागरिक उन्हाळ्यासारखा असह्य उकाड्याचा अनुभव घेत आहेत.
जिल्ह्यात सध्या विचित्र वातावरण निर्माण झाले आहे. पहाटे हलकासा गारवा, दिवसभर कडक ऊन आणि रात्रीच्या वेळी उकाडा निर्माण होत असून, या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे.
पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात तापमानात वाढले आहे. सर्वसाधारणपणे ३० अंशावर असणारे कमाल तापमान ३५ अंशाच्या पुढे सरकल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळी १० वाजेपासूनच उन्हाचा पारा वाढत असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत कडक ऊन पडत आहे. अंगाला चटके देणारे आणि डोळे दीपवणारे ऊन नागरिकांना असह्य करीत आहेत. दीड महिन्यापासून पाऊस गायब असून, त्याची जागा कडक उन्हान घेतली आहे. हस्त नक्षत्रात सर्वसाधारणपणे ऊन तापतेच. आॅक्टोबर महिन्यात या नक्षत्राला सुरुवात होते. मात्र यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच ऊन तापू लागले आहे. वातावरणातील दमटपणाही वाढला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत असून, नागरिक त्रस्त आहेत. शेतकऱ्यांना सध्या परतीच्या पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र पावसाऐवजी उन्हाची तीव्रताच वाढत चालल्याने जिल्हावासियांच्या चिंता वाढत आहेत.