परभणी: गोदावरी पात्रातील वाळू चोरीला लगाम लागेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:53 IST2019-04-02T23:53:21+5:302019-04-02T23:53:48+5:30

गोदावरी नदीपात्रातून रात्रं-दिवस होत असलेल्या वाळू चोरीला लगाम लावण्यात महसूल प्रशासनाला अपयश येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्याच बरोबर महसूल व पोलीस प्रशासनाची नजर चुकवित भरधाव वेगाने धावणाऱ्या या वाळुच्या वाहनांमुळे अपघातांच्या घटनेत वाढ होत आहे.

Parbhani: Storm in the Godavari area sticks to the bridle | परभणी: गोदावरी पात्रातील वाळू चोरीला लगाम लागेना

परभणी: गोदावरी पात्रातील वाळू चोरीला लगाम लागेना

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): गोदावरी नदीपात्रातून रात्रं-दिवस होत असलेल्या वाळू चोरीला लगाम लावण्यात महसूल प्रशासनाला अपयश येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्याच बरोबर महसूल व पोलीस प्रशासनाची नजर चुकवित भरधाव वेगाने धावणाऱ्या या वाळुच्या वाहनांमुळे अपघातांच्या घटनेत वाढ होत आहे.
तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रातील वाळूला मोठी मागणी आहे;परंतु, वाळू धक्याचा लिलाव मागील वर्षापासून झाला नसल्याने वाळू माफियांनी नदीपात्रात चांगलाच धूडगूस घालीत वाळू दिसेल तेथून रात्रं-दिवस वाळूचा बेसुमार अवैध उपसा चालविला. यामुळे गोदावरी नदीपात्रात पहावे तेथे खड्डे निर्माण झाले आहेत. यातच तालुक्यात गोदावरी नदीपात्रात असलेल्या १३ वाळू धक्यांपैकी केवळ २ वाळू धक्यांचा चालू वर्षात लिलाव झाला असल्याने वाळू चोरीला वाव मिळत आहे.
गोदावरी नदीपात्रातून विनापरवाना होत असलेल्या वाळू चोरीमुळे गोदाकाठच्या गावातील पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत असल्याने गोदाकाठच्या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नदीपात्रातून होणारी ही वाळू चोरी रोखण्यासाठी गोदावरी नदीकाठावरील ग्रामस्थांनी वारंवार महसूल प्रशासनाकडे तोंडी व लेखी स्वरुपात तक्रारी दिल्या. त्याच बरोबर तलाठ्यांनीही वाळू माफिया आमचे ऐकत नाहीत, कार्यवाही केल्यानंतरही वाळूचा बेसुमार उपसा होत असल्याचा लेखी स्वरुपातील अहवाल तहसील कार्यालयात सादर करून यावर उपाययोजना करण्याची मागणी केली. यामध्ये तलाठ्यांबरोबरच गावातील सरपंच, पोलीस पाटील यांनीही तलाठ्यांच्या अहवालावर आपल्या स्वाक्षºया केल्या आहेत. मात्र विनापरवाना होणारी वाळू चोरी रोखण्यात महसूल प्रशासनाला आजपर्यंत यश आले नसल्याने महसूल प्रशासनाच्या भूमिकेवरच नागरिकातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
तालुक्यातील गौंडगाव, मैराळ सावंगी, धारासूर, झोला पिंपरी, धारखेड, गंगाखेड शहर, रेल्वे पूल परिसर, चिंचटाकळी येथील गोदावरी पात्रातून बेसुमार वाळू उपसा केला जात आहे. पोलीस व महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेऊन वाळूमाफिया ही वाळू पिंपळदरी, राणीसावरगाव, कोद्री, परळी रोड, भारस्वाडा मार्गे परभणी आदी मार्गावरून तालुक्याबाहेर हलवित आहेत. प्रशासनाची नजर चुकविण्यासाठी वाळूने भरलेली वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने अपघाताच्या घटनेतही वाढ होत आहे.
मागील महिन्यात २२ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास वाळूने भरलेले हायवा वाहन भरधाव वेगात पिंपळदरीकडे जात असताना या ट्रकने खोकलेवाडी पाटीजवळ सुधाकर विठ्ठलराव बोके (रा. खोकलेवाडी) यांच्या दुचाकीला जोराची धडक देऊन गंभीर जखमी केले होते. त्याच बरोबर किरकोळ घटनाही घडत आहेत. त्यामुळे याकडे तालुका महसूल प्रशासनासह जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी अवैध वाळू उपशाला लगाम लावावा, अशी मागणी होत आहे.
महसूलच्या हालचालीवर पंटरची पाळत
४महसूल प्रशानाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वाळू माफियांनी रोजंदारीवर पंटर नेमले आहेत. हे पंटर महसूल प्रशासनाच्या बारिक-सारिक हालचालींची माहिती वाळू माफियांना देत असल्याने वाळूची चोरी वाढली असल्याचे दिसत आहे. यामध्ये गंगाखेड शहरात पोलीस ठाणे, तहसील कार्यालय, कोद्री रेल्वे फाटक, बसस्थानक परिसरातील पालम नाका रेल्वे फाटकाजवळ, परळी नाका, खळी पाटी, महातपुरी फाटा आदी ठिकाणी पंटरकडून माहिती दिली जात आहे. ही माहिती मिळाल्यास वाळूमाफिया आपली वाळूची वाहने तातडीने इतरत्र हलवित असल्यामुळे कार्यवाहीसाठी आलेल्या अधिकाºयांच्या हाती काहीच लागत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाला हे वाळूमाफिया वरचढ होत असल्याचे दिसत आहे.

Web Title: Parbhani: Storm in the Godavari area sticks to the bridle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.