परभणी : जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीस गैरहजर २२ बीएलओंना कारणे दाखवा नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:13 IST2018-09-27T00:12:31+5:302018-09-27T00:13:26+5:30
मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस अनुस्थित राहिलेल्या जिल्ह्यातील २२ बीएलओंना जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत़

परभणी : जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीस गैरहजर २२ बीएलओंना कारणे दाखवा नोटीस
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस अनुस्थित राहिलेल्या जिल्ह्यातील २२ बीएलओंना जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत़
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे़ जिल्ह्यातील एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही, या दृष्टीकोणातून छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम सध्या राबविण्यात येत आहे़ या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली़
या बैठकीस २२ बीएलओ गैरहजर असल्याचे दिसून आले़ या गैरहजर बीएलआेंना तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी डॉ़ सुचिता शिंदे यांना यावेळी देण्यात आले आहेत़ गैरहजर बीएलओंना नोटीस दिल्यानंतर त्यांच्याकडून तातडीने खुलासा मागवून घ्यावा, असेही निर्देश जिल्हाधिकाºयांनी यावेळी दिले़ यावेळी जिल्हाधिकाºयांनी मतदार यादी पुनर्रिक्षण कार्यक्रमाचा आढावा घेतला़
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ सप्टेंबर २०१८ ते ३१ आॅक्टोबर २०१८ पर्यंत नव मतदारांची नोंदणी, दुबार, मयत आणि स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे आणि मतदार यादीतील नाव, पत्ता, वय, लिंग, फोटो आदी दुरुस्तीचे काम सुरू आहे़ मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री बीएलओ किंवा तहसील कार्यालयात जाऊन करावी, असेही यावेळी आवाहन करण्यात आले़ यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी महादेव किरवले, उपविभागीय अधिकारी डॉ़ सुचिता शिंदे आदींची उपस्थिती होती़
प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी सुरू
लोकसभा निवडणूक मार्च किंवा एप्रिल २०१९ मध्ये होण्याची शक्यता आहे़ त्यानुसार भारत निवडणूक आयोगाकडून या निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे़ या अनुषंगाने मतदार यादी पुनर्रिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे़ यासाठी बीएलओंची बुधवारी परभणीत कार्यशाळा घेण्यात आली़