परभणी :प्रचार तोफा थंडावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 23:44 IST2019-10-19T23:43:54+5:302019-10-19T23:44:15+5:30
१३ दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी शनिवारी सायंकाळी ६ वाजता थांबली आहे़ शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने चारही मतदारसंघात उमेदवारांनी मोठे शक्तीप्रदर्शन करीत रॅली काढली़ या रॅलीच्या माध्यमातून उमेदवारांनी मतदारांना आवाहन केले़

परभणी :प्रचार तोफा थंडावल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : १३ दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी शनिवारी सायंकाळी ६ वाजता थांबली आहे़ शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने चारही मतदारसंघात उमेदवारांनी मोठे शक्तीप्रदर्शन करीत रॅली काढली़ या रॅलीच्या माध्यमातून उमेदवारांनी मतदारांना आवाहन केले़
७ आॅक्टोबर रोजी अंतीम उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात प्रत्यक्ष जाहीर प्रचाराला सुरुवात झाली़ हा प्रचार करीत असतानाही उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन केले होते आणि प्रचाराची सांगता करतानाही शक्ती प्रदर्शन करीत रॅली काढण्यात आल्या़ त्यामुळे निवडणुकीचा ज्वर आता शिगेला पोहचला आहे़ १९ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता जाहीर प्रचार थांबला असून, उमेदवार आता मतदारांच्या गाठीभेटी घेवून छुप्या मार्गाने प्रचार करण्याची शक्यता आहे़
शनिवारी सकाळपासूनच शहरामध्ये कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती़ प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी रॅली काढत शक्तीप्रदर्शनावर भर दिला़ दुपारी १२ वाजेनंतर शहरातील विविध मार्गावरून रॅलींना सुरुवात झाली़ दिवसभर रॅलींमुळे शहरातील रस्त्यांवर वेगवेगळ्या पक्षांचे झेंडे, बिल्ले झळकत होते़ आपल्या पक्षाचा रुमाल गळ्यात घालून कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते़ उमेदवारांच्या रॅलीमुळे शहरात निवडणुकीचा ज्वर चढल्याचे दिसून आले़ सायंकाळी ४ वाजेपर्यंत सर्व उमेदवारांच्या रॅली पूर्ण झाल्या़ चारही मतदार संघातील जाहीर प्रचार आता थांबला आहे़ मतदानासाठी आणखी एक दिवसांचा काळ शिल्लक आहे़ या काळात मतदारांच्या गाठीभेटी घेणे आणि वैयक्तीक प्रचारावर भर दिला जाण्याची शक्यता आहे़