परभणी आगाराचा प्रताप: यात्रेच्या नावाखाली बसफेऱ्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 00:00 IST2019-03-28T23:59:43+5:302019-03-29T00:00:22+5:30
परभणी आगाराने सैलानी यात्रेच्या नावाखाली २४ मार्चपासून परभणी-पालम ही बससेवा चार दिवसांपासून रद्द केली आहे. त्यामुळे नऊ गावातील प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला.

परभणी आगाराचा प्रताप: यात्रेच्या नावाखाली बसफेऱ्या रद्द
लोकमत न्यूज नेटवर्क
ताडकळस : परभणी आगाराने सैलानी यात्रेच्या नावाखाली २४ मार्चपासून परभणी-पालम ही बससेवा चार दिवसांपासून रद्द केली आहे. त्यामुळे नऊ गावातील प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला.
परभणी-ताडकळस-पालम हा वर्दळीचा रस्ता आहे. हा मार्ग नांदेड जिल्ह्याला जोडणारा असल्याने प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळे परभणी आगाराने परभणी-पालम ही बससेवा गेल्या काही वर्षांपासून सुरू केलेली आहे. एसटी महामंडळाचा सुरक्षित प्रवास असल्याने प्रवाशांनीही या बससेवेला प्रतिसाद दिला. याबसने पालम, गुळखंड, जवळा, ताडकळस, धानोरा, मिरखेल, पिंगळी, बलसा, सिरसकळस या गावातील प्रवासी, विद्यार्थी ये-जा करतात. या बससेवेतून परभणी आगारालाही चांगले उत्पन्न मिळते ; परंतु, परभणी आगाराने सैलानी यात्रेच्या नावाखाली २४ मार्चपासून परभणी-पालम ही बससेवा बंद केली. त्यामुळे परभणी-ताडकळस-पालम या मार्गावरील वाहतुकीचे तीन-तेरा वाजले आहेत. प्रवाशांनाही नाहक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे परभणी ही बससेवा बंद करण्याअगोदर प्रवाशांना व संबंधित ग्रामपंचायतीला कळविणे गरजेचे होते; परंतु, कोणतीही सूचना न देता बससेवा बंद केल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांना अवैध प्रवासी वाहतुकीचा सहारा घेऊन गेल्या चार दिवसांपासून आपला प्रवास पूर्ण करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.