Parbhani-Pathari road: Trees broken down; Only the road works | परभणी-पाथरी रस्ता :झाडे तोडली; मात्र रस्ता काम रखडले

परभणी-पाथरी रस्ता :झाडे तोडली; मात्र रस्ता काम रखडले

लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी): पाथरी-परभणी या राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी संबंधित गुत्तेदाराने २५ किमी रस्त्यावरील मोठ मोठ्या झाडांची कत्तल करण्यासाठी तत्परता दाखविली; परंतु, त्यानंतर वर्षभराचा कालावधी लोटला असला तरी रस्त्याचे काम मात्र साईडपट्ट्याच्या खोदकामाव्यतिरिक्त पुढे गेले नाही़ विशेष म्हणजे, सहा महिन्यांपासून तर या रस्त्याचे काम पूर्णत: बंद आहे़ त्यामुळे झाडे तोडण्यासाठी तत्परता दाखविलेल्या गुत्तेदाराने रस्त्याचे कामही तेवढ्याच तत्परतेने मार्गी लावावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे़
कल्याण-निर्मल राष्ट्रीय महामार्ग २२२ हा रस्ता अहमदनगर-बीड-परभणी-नांदेड या जिल्ह्यातून जातो़ नगर जिल्ह्यातून रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर पाथर्डी-गढीफाटा-माजलगाव, पाथरी आणि मानवत रोड रेल्वे स्टेशनपर्यंत या रस्त्याचे काम दोन वर्षापूर्वी पूर्ण करण्यात आले़ परंतु, त्यानंतर मानवत रोड रेल्वे स्टेशनच्या रेल्वे लाईनवर हाती घेण्यात आलेल्या उड्डाण पुलाचे काम काही महिन्यांपासून बंद आहे़ केंद्र शासनाने राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा बदलत ६१ वर आणून कल्याण ते विशाखापटणम् करण्यात आला़
परभणी जिल्ह्यात ढालेगावपासून मानवत रोडपर्यंत जवळपास २५ किमी रस्त्याचे काम पूर्ण होत आले आहे़ त्या पुढील रस्ता कोल्हापाटी ते परभणीपर्यंत साधारणत: २५ किमीचे कामही दोन वर्षापूर्वी मंजूर करण्यात आले़ हैदराबाद येथील एजन्सीने काम हाती घेतले असून, हे काम मंजूर होऊनही या गुत्तेदाराने कामाची सुरुवात मात्र उशिरानेच केली़ त्यामुळे प्रवासी नागरिकांतून ओरड झाल्यानंतर या कामास सुरुवात करण्यात आली़ गतवर्षी या महामार्गाची दुरवस्था झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती़ त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे डांबरीकरणाने बुजविण्यात आले होते़ परंतु, महामार्ग असल्यामुळे या रस्त्यावर मोठी वर्दळ असते़ परिणामी बुजविलेल्या खड्ड्यांची सध्या वाताहत झाली आहे़ राष्ट्रीय महामार्गावर परभणी शहरापर्यंत मोठ मोठी झाडे अस्तित्वात होती़ दुतर्फा झाडांनी रस्त्यावर भर उन्हाळ्यात प्रवासी, वाहनधारकांना सावली मिळत असे़ मात्र रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी मागील ८ ते १० महिन्यांपूर्वीच रस्त्यावरील वड, लिंब, बाभळ ही मोठी झाडे तोडण्यास संबंधित गुत्तेदाराने तत्परता दाखविली़ या तत्परतेनंतर गुत्तेदार रस्त्याचे कामही तेवढ्याच तत्परतने पूर्ण करील, अशी अपेक्षा होती़ परंतु, मागील एक वर्षापासून या रस्त्याच्या केवळ साईडपट्ट्या भरण्यात आल्या आहेत़ या रस्त्याचे काम सध्या बंद आहे़ त्यामुळे रहदारीला यामुळे मोठा अडथळा निर्माण होत आहे़ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन हा रस्ता पूर्ण करावा, अशी मागणी होत आहे़
५०० झाडांची केली कत्तल
४या राष्ट्रीय महामार्गावर वडाची मोठ मोठी झाडे असल्याने रस्त्याला झाडांचा वेढा पडलेला दिसत होता़ त्यामुळे भर उन्हाळ्यातही प्रवाशांचा प्रवास सुखकर होत असे़
४रस्त्याच्या कामासाठी वडासह इतर जवळपास ५०० झाडे तोडण्यात आली़ त्यानंतर रस्त्याचे कामही बंद करण्यात आले़ त्यामुळे ५०० झाडे तोडण्यासाठी एवढी तत्परता का, असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित झाला आहे़
४त्याचबरोबर कोल्हापाटी ते परभणीपर्यंतचा २५ किमी रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने चार चाकी वाहनांना हा रस्ता पार करण्यासाठी किमान एक तासाचा कालावधी लागत आहे़ त्यामुळे वाहनधारकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे़

Web Title: Parbhani-Pathari road: Trees broken down; Only the road works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.