परभणी महानगरपालिकेत एकमताने ठराव पारित : निवासासाठी उठविले खेळाच्या मैैदानाचे आरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:38 IST2017-12-05T00:38:18+5:302017-12-05T00:38:31+5:30
राष्टÑीय महामार्गावर शहरातील जिंतूररोडलगत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या खेळाच्या मैदानाचे आरक्षण उठविण्याचा ठराव सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची ही जागा आता निवासस्थानांच्या नावाखाली आर्थिक उलाढालीसाठी वापरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

परभणी महानगरपालिकेत एकमताने ठराव पारित : निवासासाठी उठविले खेळाच्या मैैदानाचे आरक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : राष्टÑीय महामार्गावर शहरातील जिंतूररोडलगत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या खेळाच्या मैदानाचे आरक्षण उठविण्याचा ठराव सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची ही जागा आता निवासस्थानांच्या नावाखाली आर्थिक उलाढालीसाठी वापरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
३ नोव्हेंबर रोजी तहकूब झालेली मनपाची सर्वसाधारण सभा सोमवारी बी.रघुनाथ सभागृहात पार पडली. महापौर मीना वरपूडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस उपमहापौर माजूलाला, आयुक्त राहुल रेखावार, नगरसचिव सय्यद इम्रान यांची उपस्थिती होती.
या सभेत मागील इतिवृत्तांताच्या वाचनाबरोबरच खेळाच्या मैदानावरील आरक्षण उठविण्याचा विषय, विषय पत्रिकेवर घेतला होता. विषय क्रमांक ४५ नुसार परभणी शहरातील जिंतूररोडवर सर्वे नं.५७७ मध्ये ज्ञानोपासक महाविद्यालयाचे खेळाचे मैदान आहे. या ठिकाणी शारीरिक शिक्षण महाविद्यालय तसेच माजी खा.गणेशराव दुधगावकर यांचे संपर्क कार्यालय आहे. हे मैदान रहिवासी क्षेत्र म्हणून जाहीर करण्यास मंजुरी द्यावी, असा ठराव घेण्यात आला. या ठरावावर चर्चा करताना नगरसेवक सचिन देशमुख वगळता एकाही नगरसेवकाने आक्षेप घेतला नाही किंवा चर्चाही केली नाही. त्यामुळे हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
जिंतूररोडवर ज्ञानोपासक महाविद्यालयाचे मैदान असून या मैदानावर विद्यार्थी विविध खेळांचा सराव करतात. विशेष म्हणजे, राजकीय पक्षांच्या सभा, छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रमही येथे होतात. विकास आराखड्यामध्ये ही जागा खेळाचे मैदान म्हणून आरक्षित आहे. २७११.५० चौरस मीटर एवढ्या क्षेत्रफळाची ही जागा असून दिलीप वसमतकर व सुरेश शर्मा हे या जागेचे मूळ मालक आहेत. आता ही जागा ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मालकी हक्कात आहे. महाविद्यालयाच्या पत्रानुसार महानगरपालिकेने ही जागा खेळासाठी आरक्षित केली असल्याचे आयुक्त राहुल रेखावार यांनी सांगितले. हा ठराव चर्चेला आल्यानंतर तो मंजूर करण्यात आला.
या ठरावावर १० मिनिटांचीच चर्चा झाली. केवळ नगरसेवक सचिन देशमुख यांनीच यावर आक्षेप घेतला. दिवसेंदिवस शहराची व्याप्ती वाढत आहे. शहरामध्ये खेळाची मैदाने उपलब्ध नाहीत. महानगरपालिकेलाच अग्नीशमन दल, नाट्यगृह उभारण्यासाठी जागा उपलब्ध नाही, अशा परिस्थितीमध्ये आरक्षण उठवून ती जागा निवासस्थानासाठी देणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित करीत हा ठराव मला मान्य नाही, असे सभागृहाला स्पष्ट सांगितले. मात्र त्यांचा विरोध हा एकाकी पडला आणि ठरावाला मंजुरी देण्यात आली.