Parbhani: Murder of a woman killed by a sharp weapon | परभणी : तीक्ष्ण हत्याराने गळा चिरुन महिलेचा खून

परभणी : तीक्ष्ण हत्याराने गळा चिरुन महिलेचा खून

लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी): एका ३५ वर्र्षींय महिलेचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरुन खून केल्याची घटना ३० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास तालुक्यातील उक्कलगाव शिवारात उघडकीस आली आहे. आशामती तुकाराम पिंपळे असे या मयत महिलेचे नाव आहे.
उक्कलगाव येथील तुकाराम पिंपळे हे मुलाला शाळेत सोडविण्यासाठी बाहेर गावी गेले होते. त्यामुळे त्यांच्या पत्नी आशामती पिंपळे या गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शेतात गेल्या. तुकाराम पिंपळे हे गावात परत आल्यानंतर सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास ते शेतात गेले. मात्र पत्नी शेतात आढळली नाही. त्यामुळे त्यांनी शेत शिवारामध्ये शोध घेतला असता शेताच्या कडेलाच रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आशामती यांचा मृतदेह आढळला. त्यांचा गळा हत्याराने चिरलेला होता. तर शरीरावर पाच ते सहा ठिकाणी वार असल्याचे दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश एकबोटे, सहाय्यक निरीक्षक शिवाजी पवार, जमादार शेख गौस, दीपक वाव्हळे, बालकिशन मगर, चाटे, परसोडे यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वान पथक, ठसे तज्ज्ञांना पाचरण करण्यात आले. घटनास्थळावरील संशयित बोटांचे ठसे घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. दरम्यान, निर्घृंण खुनाच्या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा खून कोणी व का केला, याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता.

Web Title: Parbhani: Murder of a woman killed by a sharp weapon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.