सातव यांच्या अटकेच्या निषेधार्थ परभणीत आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:37 IST2017-12-04T00:36:41+5:302017-12-04T00:37:27+5:30
हिंगोलीचे खा.राजीव सातव यांना अटक केल्याच्या निषेधार्थ परभणीत युवक काँग्रेस आणि काँग्रेसच्या वतीने भाजपचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन करुन भाजपचा निषेध नोंदविला.

सातव यांच्या अटकेच्या निषेधार्थ परभणीत आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : हिंगोलीचे खा.राजीव सातव यांना अटक केल्याच्या निषेधार्थ परभणीत युवक काँग्रेस आणि काँग्रेसच्या वतीने भाजपचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन करुन भाजपचा निषेध नोंदविला.
गुजरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक केल्याने पोलिसांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या खा.राजीव सातव यांनाही गुजरात पोलिसांनी अटक केली होती. या घटनेचे पडसाद परभणीत उमटले असून, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील उड्डाणपुलावर भाजपाच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेमारो आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी संजय लहाने, गौतम भालेराव, धीरज कांबळे, अंगद सोगे, राहुल मोगले, लखन धाडवे यांच्यासह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वसमत रस्त्यावरील कृषी विद्यापीठ कमानीजवळ सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास काँग्रेसच्या वतीने भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. काँग्रेसचे प्रदेश सचिव बाळासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. बबनराव पवार, ज्ञानेश्वर जोगदंड, सुहास पंडित, गोपीनाथ राठोड, अक्षय देशमुख, सुरेश काळे, गौतम वाघमारे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.