परभणी : बालकास मारहाण; पित्याविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:23 IST2019-05-11T00:23:25+5:302019-05-11T00:23:58+5:30
तुझी आजी माझ्या जेवणात काही तरी औषध टाकत आहे, असे म्हणत आपल्याच पाच वर्षीय चिमुकल्यास निर्दयी बेदम मारहाण करणाऱ्या पित्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी दुपारी ४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणी : बालकास मारहाण; पित्याविरुद्ध गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : तुझी आजी माझ्या जेवणात काही तरी औषध टाकत आहे, असे म्हणत आपल्याच पाच वर्षीय चिमुकल्यास निर्दयी बेदम मारहाण करणाऱ्या पित्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी दुपारी ४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगाखेड शहरातील मन्नाथनगर भागात मुलगा विलास बालाजी मनदुबले (३५) व दोन लहान नातवांसोबत लक्ष्मीबाई बालाजी मनदुबले (५५) या राहतात. ९ मे रोजी लक्ष्मीबाई या कामानिमित्त बाहेर गेल्या असता त्यांचा मुलगा विलास मनदुबले याने त्याचा पाच वर्षीय मुलगा यश याला ‘तुझी आजी माझ्या जेवणात काही तरी औषध टाकत आहे’ असे म्हणून कमरेच्या चामडी पट्ट्याने पोटावर, पाठीवर, गालावर व डोक्यात अत्यंत निर्दयीपणे मारहाण केली. त्यामुळे यशचे संपूर्ण अंग रक्ताळले व त्याच्या व्रण उमटून त्याला गंभीर दुखापत झाली. याचवेळी शेजारी राहणाºया हनुमान नामक व्यक्तीने यशला एवढी मारहाण का केली, असे विलास मनदुबले याला विचारले असता त्यालाही त्याने शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली.
आजी लक्ष्मीबाई मनदुबले या घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार समजला. त्यांनी यशला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा गंगाखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन आरोपी पिता विलास मनदुबले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या पूर्वीही चार दिवसांपूर्वी विलासने त्याच्या दुसºया मुलास अशीच मारहाण केली होती. त्यामुळे या निर्दयी पित्याविषयी नागरिकांनी संताप व्यक्त केला. या घटनेचा नागरिकांनी निषेधही केला आहे.