परभणी : सूचक विधानातून मुख्यमंत्र्यांचे स्वबळाचे संकेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 11:31 PM2019-08-30T23:31:25+5:302019-08-30T23:33:50+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या महाजनादेश यात्रेअंतर्गत घेतलेल्या जाहीर सभांमध्ये जाहीरपणे कोेठेही शिवसेनेचा नामोल्लेख केला नाही; परंतु, परभणीत आयोजित पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर ‘युती होईल’, एवढेच अत्यंत त्रोटक व सूचक विधान त्यांनी केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा राज्यात स्वबळावर लढेल, असे संकेत मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून सुरु झाली आहे.

Parbhani: An indication of the Chief Minister's self-worth through suggestive statements? | परभणी : सूचक विधानातून मुख्यमंत्र्यांचे स्वबळाचे संकेत?

परभणी : सूचक विधानातून मुख्यमंत्र्यांचे स्वबळाचे संकेत?

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या महाजनादेश यात्रेअंतर्गत घेतलेल्या जाहीर सभांमध्ये जाहीरपणे कोेठेही शिवसेनेचा नामोल्लेख केला नाही; परंतु, परभणीत आयोजित पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर ‘युती होईल’, एवढेच अत्यंत त्रोटक व सूचक विधान त्यांनी केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा राज्यात स्वबळावर लढेल, असे संकेत मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून सुरु झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा गुरुवारी परभणी जिल्ह्यात दाखल झाली. त्यानंतर त्यांच्या सेलू, पाथरी व परभणी येथे जाहीर सभा झाल्या. सेलूच्या सभेत त्यांनी भाजपाच्या युवा नेत्या मेघना बोर्डीकर यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले.
तसा त्यांनी उपस्थितांमधून जिंतूरमध्ये मेघना बोर्डीकर यांच्यासाठी तर परभणीत भाजपाचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांच्यासाठी आशीर्वाद मागितला. हे दोन्हीही विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. शिवाय पाथरीतही मुख्यमंत्र्यांनी आ.मोहन फड यांच्यासाठी आशीर्वाद मागितला. पाथरीही शिवसेनेकडेच आहे. त्यामुळे या तिन्ही ठिकाणी तिन्ही इच्छुकांची नावे मुख्यमंत्र्यांनी घेतल्याने भाजपा स्वबळावर लढणार का? याची चर्चा सुरु झाली आहे. शिवाय पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनीही जिल्ह्यातील चारही विधानसभेच्या जागा निवडून देण्याचे आवाहन आपल्या भाषणामधून केले. त्यामुळे लोणीकरांचे विधानही स्व:बळाच्या नाऱ्याला पूरक समजले जात आहे.
शुक्रवारी परभणी येथील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी राज्यात शिवसेना- भाजपाची युती होणार का? असा प्रश्न उपस्थित केला असता मुख्यमंत्र्यांनी ‘युती होणार’ एवढेच दोन शब्द उच्चारले, याबाबत उपप्रश्न विचारल्यानंतरही सविस्तर बोलण्याचे त्यांनी जाणीवपूर्वक टाळले. त्यामुळे त्यांचे या प्रश्नातील मौन बरेच काही सांगून जाते, अशी चर्चा होऊ लागली आहे.
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने निवडणूक लढविण्याची तयारी यापूर्वीच चालविली आहे. जिंतूरमधून विधानसभा अध्यक्ष तथा जि.प.सदस्य राम खराबे तर गंगाखेडमधून जिल्हाप्रमुख विशाल कदम हे निवडणूक लढवू इच्छित आहेत. पाथरीत शिवसेनेकडे इच्छुकांची रांग लागली आहे. परभणी मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असून येथे आ.डॉ.राहुल पाटील यांनी अनेक महिन्यांपासून निवडणुकीची तयारी चालविली आहे. तर दुसरीकडे भाजपानेही चारही विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची तयारी यापूर्वीच सुरु केली होती.
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी विधानसभा मतदारसंघ निहाय भाजपाच्या वतीने आढावाही घेण्यात आला होता. बुथ प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली होती. आता तीच बुथ प्रमुखांची यादी पुन्हा बाहेर येईल, अशी चर्चा होत आहे. असे झाले तर जिल्ह्यात काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना, भाजपा आणि वंचित बहुजन आघाडी अशी चौरंगी लढत पहावयास मिळेल.
भाजपा आज परभणीत घेणार इच्छुकांच्या मुलाखती
४भाजपाचे नेते एकीकडे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती होणार असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र पक्षाच्या वतीने स्व:बळाचीच तयारी केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपाचे पक्ष निरीक्षक तथा राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे शनिवारी परभणीत दाखल होणार आहेत.
४भेगडे हे परभणी, पाथरी, जिंतूर व गंगाखेड या चारही विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते याबाबतचा अहवाल प्रदेश कमिटीकडे सादर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे मुलाखतीच्या वेळी कोणीही शक्ती प्रदर्शनाच्या भानगडीत पडू नये, असा सूचनावजा इशारा अप्रत्यक्षरित्या इच्छुकांना देण्यात आला असल्याचे समजते.

Web Title: Parbhani: An indication of the Chief Minister's self-worth through suggestive statements?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.