परभणी : आॅनलाईन औषध विक्रीच्या निर्बंधाची अंमलबजावणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 00:58 IST2019-12-18T00:58:03+5:302019-12-18T00:58:39+5:30
आॅनलाईन औषधी विक्रीला निर्बंध घालण्याचे निर्देश दिल्ली येथील उच्च न्यायालयाने दिले असून या निर्देशांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी परभणी जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने केली असून याबाबत अन्न व औषधी प्रशासनाला निवेदन दिले आहे.

परभणी : आॅनलाईन औषध विक्रीच्या निर्बंधाची अंमलबजावणी करा
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : आॅनलाईन औषधी विक्रीला निर्बंध घालण्याचे निर्देश दिल्ली येथील उच्च न्यायालयाने दिले असून या निर्देशांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी परभणी जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने केली असून याबाबत अन्न व औषधी प्रशासनाला निवेदन दिले आहे.
डॉ.जहीर अहमद यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीत १२ डिसेंबर २०१८ रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. तसेच ड्रग कंट्रोलर जनरल आॅफ इंडियाचे डॉ.व्ही.जी.सोमाणी यांनी २८ नोव्हेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. आॅनलाईन औषध विक्रीमुळे निर्माण होणारे संभाव्य धोके आणि जनसामान्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम याबाबत अनेक वेळा प्रशासनाला निवेदने देऊनही त्याचा फारसा उपयोग झाला नाही. औषधी व्यवसाय हा विशिष्ट कायद्यांतर्गत व फार्मसी शिक्षण घेतलेल्या रजिस्टर्ड फार्मासिस्टच्या देखरेखीखाली होणे गरजेचे असताना औषधींची आॅनलाईन विक्री सर्रास होत आहे. या विरोधात तक्रारी करुनही प्रशासनाने गंभीर दखल घेतली नाही. आता न्यायालयाच्या आदेशाचे पालन प्रशासनाने करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात अन्न व औषध प्रशासनाने सहायक आयुक्त मरेवाड यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय मंत्री, सचिव सूर्यकांत हाके, पवन झांजरी, अनिल हराळ, गणेश पद्मवार, सुनील अग्रवाल, सुनील जोशी, शिवा पुरी, गोकुळ दाड, विजय कुचेरिया आदींची उपस्थिती होती.