परभणी : आरोग्य विभागाने झटकले हात, लसीकरणामुळे मृत्यू नसल्याचा व्यक्त केला अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:44 IST2018-11-11T00:44:07+5:302018-11-11T00:44:39+5:30
पालम तालुक्यातील रोकडेवाडी येथे ७ नोव्हेंबर रोजी लसीकरणानंतर दोन बालकांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आरोग्य विभागाने चार दिवसांनी खुलासा केला असून लसीकरणामुळे बालकांचा मृत्यू झाला नसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोग्य विभागाने हात झटकल्याचेच दिसत आहे.

परभणी : आरोग्य विभागाने झटकले हात, लसीकरणामुळे मृत्यू नसल्याचा व्यक्त केला अंदाज
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पालम तालुक्यातील रोकडेवाडी येथे ७ नोव्हेंबर रोजी लसीकरणानंतर दोन बालकांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आरोग्य विभागाने चार दिवसांनी खुलासा केला असून लसीकरणामुळे बालकांचा मृत्यू झाला नसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोग्य विभागाने हात झटकल्याचेच दिसत आहे.
रोकडेवाडी येथे ६ नोव्हेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र रावराजूर अंतर्गत लसीकरण करण्यात आले होते. लसीकरणानंतर दोन बालकांचा मृत्यू झाला असून या प्रकरणात आरोग्य विभागाने स्वतंत्र प्रसिद्धी पत्रक काढून हा मृत्यू लसीकरणामुळे झाला नसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. रोकडेवाडी येथील ज्या समूह क्रमांकाच्या लसी बालकांना देण्यात आल्या. त्याच समूह क्रमांकाच्या लसी इतर ७ गावांमध्येही दिल्या आहेत. तेथील बालकांची प्रकृती चांगली असल्याची खात्री आरोग्य विभागाने केली आहे. तसेच प्रत्येक लसीकरण सत्रापूर्वी मार्गदर्शक सूचनाचा अवलंब व काळजी घेतली जाते. तीच काळजी रोकडेवाडी येथेही घेण्यात आल्याचेही प्राथमिक चौकशीत दिसून आले, असेही जिल्हा माता बालसंगोपन अधिकाऱ्यांनी या पत्रकात म्हटले आहे. त्याचप्रमाणे रोकडेवाडी येथील बालके कोणत्या कारणांमुळे दगावली, याबाबत शवविच्छेदन अहवाल, जागतिक आरोग्य संघटना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विशेषज्ञ आदींची समिती सखोल चौकशी करीत असल्याचेही स्पष्ट केले आहे. परंतु, या चौकशीपूर्वीच बालकांचा मृत्यू लसीकरणाने झाला नसल्याचा प्राथमिक अंदाज आरोग्य विभागाने वर्तविला.
शिवाय लसीकरणासाठी बालकाचे वजन किमान अडीच किलो असणे आवश्यक आहे. दगावलेल्या बालकाचे वजन अडीच किलोपेक्षा कमी होते, याबाबत मात्र कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.