परभणी : गोदावरी, पूर्णा दुथडी भरून वाहू लागल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 12:19 AM2019-09-03T00:19:30+5:302019-09-03T00:19:47+5:30

जिल्हाभरात गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे विविध ओढे व नाल्यांना पाणी आले असून, पूर्णा तालुक्यातील पूर्णा आणि गोदावरी नद्या यावर्षी पहिल्यांदाच दुथडी भरून वाहत असल्याचे पहावयास मिळाले़

Parbhani: Godavari, Purna started flowing in full | परभणी : गोदावरी, पूर्णा दुथडी भरून वाहू लागल्या

परभणी : गोदावरी, पूर्णा दुथडी भरून वाहू लागल्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हाभरात गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे विविध ओढे व नाल्यांना पाणी आले असून, पूर्णा तालुक्यातील पूर्णा आणि गोदावरी नद्या यावर्षी पहिल्यांदाच दुथडी भरून वाहत असल्याचे पहावयास मिळाले़ पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधाऱ्यात ४२ टक्के तर सोनपेठ तालुक्यातील मुदगल बंधाºयात ४० टक्के पाणीसाठा झाला आहे़ पावसाच्या पाण्यामुळे पालम तालुक्यातील २ हजार हेक्टर जमिनीवरील पिके पाण्याखाली गेली आहेत़
परभणी जिल्ह्यात गेल्या २२ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली होती़ त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पोळा सण दुष्काळाच्या सावटाखाली साजरा केला़ पोळ्याच्या दिवसापासून म्हणजे ३० आॅगस्टपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली़ त्यानंतर ३१ आॅगस्टला मध्यम स्वरुपाचा जिल्ह्यातील विविध भागांत पाऊस झाला़ १ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात २७़३३ मिमी पावसाची नोंद झाली़ त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल ६१ मिमी पाऊस सोनपेठ तालुक्यात तर ५७़५० मिमी पाऊस गंगाखेड तालुक्यात झाला़
परभणी तालुक्यात मात्र फक्त २० मिमी पावसाची नोंद झाली़ त्यानंतर १ सप्टेंबर रोजी रात्री आणि २ सप्टेंबर रोजी पहाटेही जिल्ह्यातील विविध भागांत पावसाने हजेरी लावली़ महसूल विभागाने सोमवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यात ३७़१७ मिमी पावसाची नोंद झाली़ त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल ६३ मिमी पाऊस जिंतूर तालुक्यात तर ५६़३३ मिमी पाऊस पालम तालुक्यात झाला़
सोनपेठ व सेलू तालुक्यात प्रत्येकी ४३ मिमी तर गंगाखेड तालुक्यात ३०़५० मिमी, परभणी तालुक्यात २२़४०, मानवत तालुक्यात २४़६७, पाथरी तालुक्यात ३४़६७ आणि पूर्णा तालुक्यात १६़६० मिमी पावसाची नोंद झाली़ जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३९०़५४ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ दरम्यान, ३१ आॅगस्ट, १ आणि २ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे पहिल्यांदाच विविध ओढे व नाले वाहते झाले़ या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे़ आता जमिनीतील पाणी पातळी वाढण्यासाठी जिल्हाभरात आणखी मोठ्या प्रमाणात पाऊस पडावा, अशी अपेक्षा जिल्हावासियांमधून व्यक्त केली जात आहे़
बोरीचा तलाव ६० टक्के भरला
४बोरी- जिंतूर तालुक्यातील बोरी व परिसरात ४ दिवसांत १७८ मिमी पाऊस झाला असून, गावा शेजारचा बोरी तलाव ६० टक्के भरला आहे़ तसेच बसस्थानकामागील कोल्हापुरी बंधारा तुडूंब वाहत असून, करपरा नदीही खळखळून वाहत असल्याचे पहावयास मिळत आहे़
४गावातील हातपंप व विंधन विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे़ बोरी मंडळात दोन दिवसांत १७७ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती तलाठी नितीन बुड्डे यांनी दिली़ या पावसामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला असून, खरिपाच्या पिकांनाही जीवदान मिळाले आहे़
२ हजार हेक्टर पिके पाण्याखाली
४पालम- पालम तालुक्यातील लेंडी व गळाटी नदीला दोन दिवसांपासून पूर आला आहे़ त्यामुळे या नद्या दुथडी भरून वाहत असून, या नदीकाठच्या जवळपास शेकडो हेक्टर जमिनीवरील ज्वारी, कापूस, मूग, सोयाबीन आदी पिके पाण्याखाली गेली आहेत़ दोन्ही नद्यांचे पात्र लहान असल्याने ही समस्या निर्माण झाली असून, नदीकाठावरील जमिनी मोठ्या प्रमाणावर खरडून गेल्या आहेत़
४पुराच्या पाण्यामुळे जवळपास २ हजार हेक्टर जमिनीवरील पिकांची नासाडी झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे़ गळाटी नदीमुळे नाव्हलगाव, नाव्हा, कांदलगाव, केरवाडी, सायाळा, शिरपूर, कापसी, आरखेड, सोमेश्वर, घोडा या गावातील नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत़ तर लेंडी नदीच्या पुरामुळे आडगाव, वनभुजवाडी, पुयणी, पालम, गुळखंड, जवळा व फळा तर सेलू-पेंडू नदीमुळे या भागातील सेलू, पेंडू, वानवाडी, सरफराजपूर, कोळवाडी, पालम शिवारातील पिके पाण्याखाली गेली आहेत़
४या पिकांचा पंचनामा करण्याची मागणी शेतकºयांमधून केली जात आहे़ दुसरीकडे डिग्रस बंधाºयात जायकवाडीचे १७ दलघमी पाणी अडविण्यात आले होते़ त्यानंतर जोरदार पाऊस झाल्याने बंधाºयाच्या गेट क्रमांक १३ मधून सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात आला़ त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असल्याचे पहावयास मिळाले़
गोदावरी पाणी घेत नसल्याने कंठेश्वर येथे पूर्णा नदीचे पाणी तुंबले
४पूर्णा-हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ व वसमत तालुक्यात झालेल्या पावसामुळे या तालुक्यांमधून वाहणारी थुना नदी दुथडी भरून वाहू लागली़ पूर्णा तालुक्यात ही नदी पूर्णा नदीमध्ये येऊन विलीन होत असल्याने पूर्णा नदी ही दुथडी भरून वाहत असल्याचे सोमवारी पहावयास मिळाले़ परभणी शहराला पाणीपुरवठा करणाºया राहटी बंधाºयात यापूर्वीच पाणीसाठा होता़
४ येथील नदीपात्र परिसरातही पाऊस झाल्याने या पावसाचे पाणी पुर्णा नदीतून पुर्णेच्या दिशेने झेपावले़ परिणामी परभणी तालुक्यातही पूर्णा नदी दुथडी भरून वाहताना दिसून आली़ पूर्णा तालुक्यात पूर्णा नदी सध्या ३ मिटरने वाहत असल्याचे पहावयास मिळाले़ दुसरीकडे जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात यापूर्वीच पाणी सोडण्यात आले होते़
४हे पाणी पालम तालुक्यातील डिग्रस बंधाºयात यापूर्वी दाखल झाले होते़ धानोरा काळे परिसरात असलेला डिग्रस बंधारा पूर्ण क्षमतेने भरत असल्याने बंधाºयाच्या एका दरवाज्यातून पुढे पाणी सोडण्यात आले़ त्यामुळे धनगर टाकळी, कंठेश्वर, सारंगी या परिसरात गोदावरी पात्र दुथडी भरून वाहत होते़ कंठेश्वर येथे पूर्णा नदीचे पाणी गोदावरी नदी घेत नसल्याने पूर्णा नदीचे पाणी तुंबल्याचे पहावयास मिळाले़

Web Title: Parbhani: Godavari, Purna started flowing in full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.