Parbhani: A Fodder for Tree Plantation Campaign Officers | परभणी : वृक्ष लागवड मोहीम अधिकाऱ्यांसाठी ठरली कुरण
परभणी : वृक्ष लागवड मोहीम अधिकाऱ्यांसाठी ठरली कुरण

विठ्ठल भिसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी): राज्य शासनाची ३३ कोटी वृक्ष लागवड मोहीमही अधिकारी आणि कंत्राटदारांसाठी कुरण म्हणून वापरली जात असून, रोपे बनविण्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला़ मात्र प्रत्यक्षात तालुक्यामध्ये या रोपांची लागवडच झाली नसल्याने या मोहिमेचा फज्जा उडाला आहे़
वन विभाग, सामाजिक वनीकरण, मनरेगा आणि शासनाच्या इतर योजनांच्या माध्यमातून वृक्ष लागवड मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणावर रोपे तयार करण्यात आली़ पाथरी तालुक्यातील रोप वाटिकेत ५ लाख रोपे तयार करण्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला़ प्रत्येक ग्रामपंचायतीला ३ हजार ३०० रोपे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले़ मात्र त्यापैकी किती रोपे लावली? हा विषय संशोधनाचा ठरत आहे़ एकीकडे दुष्काळी परिस्थिती असताना दुसरीकडे वृक्ष लागवड मोहीम मात्र ठप्प आहे़ राज्य शासनाने शतकोटी वृक्ष लागवड अभियान सुरू केले़ पावसाळ्याच्या सुरवातीला वृक्ष लागवड मोहीमेला गती दिली जाते़ मात्र वर्षानुवर्षे एकाच खड्ड्यात रोपे लावण्याचे काम यंत्रणेकडून केले जात आहे़ आजही कोणत्याही शासकीय कार्यालयात मागील वर्षात लावलेल्या ठिकाणीच रोपे लावली जातात, हे सर्वश्रूत आहे़ त्यामुळे वृक्षारोपण मोहीम तर राबविली जाते; परंतु, लावलेली रोपे वृक्षात रुपांतरित होत नाहीत, ही सत्य परिस्थिती आहे़ जुलै ते सप्टेंबर या काळात गाव, शहर आणि तालुकास्तरावर वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले़ त्यासाठी वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग तसेच इतर योजनांमधून रोप वाटिकेत कोट्यवधींचा खर्च करून रोपांची निर्मिती करण्यात आली़ वन विभागाच्या पाथरी येथील विभागीय कार्यालयांतर्गतही पाथरी, मानवत या दोन तालुक्यांसाठी रोपांची निर्मिती करण्यात आली़ मात्र दुष्काळी परिस्थितीत ही झाडे लावण्यासाठी रोप वाटिकेतून तयार केलेली रोपे कागदोपत्रीच जोपासण्यात आली आहेत़ मानवत तालुक्यातील एका रोप वाटिकेतून रोपे आणण्यासाठी पाथरी तालुक्यातील शासकीय कार्यालये तसेच साखर कारखान्यांना सांगण्यात आले़ मात्र त्या ठिकाणी रोपे जळालेली असल्याने यंत्रणांनी ती उचलली नाहीत़
पाच लाख रोपांची निर्मिती
४पाथरी तालुक्यात पाच लाख रोपांची निर्मिती केल्याची प्रशासकीय माहिती आहे़ प्रत्येक ग्रामपंचायतीत ३ हजार ३०० रोपे लावण्याचे उद्दिष्ट दिले़ या भागात मोठा पाऊस झाला नसला तरी सध्या पीक परिस्थिती जोपासण्यापुरता पाऊस झाला आहे़ ४९ ग्रामपंचायतींना १ लाख ६५ हजार रोपांचा पुरवठा संबंधित यंत्रणेने केल्याची माहिती आहे़ असे असले तरी वृक्ष लागवड मोहीम मात्र एका दिवसापुरतीच राहिली आहे़ ग्रामीण भागात ग्रामपंचायत कार्यालयाबरोबरच स्मशानभूमी, ग्रामीण रुग्णालय, ग्रामपंचायत कार्यालय, पाणीपुरवठा योजना इतर शासकीय कार्यालयांच्या ठिकाणी एका दिवसांत लावलेली रोपे गायब झाल्याचे दिसून येत आहे़
दरवर्षी रोपे जातात तरी कुठे?
शासनाचा वृक्ष लागवड उपक्रम महत्त्वाकांक्षी असला तरी तो प्रत्यक्षात उतरत नाही़ नर्सरीतून रोपे तयार होतात़ मात्र ही रोपे जीवंत किती असतात हा संशोधनाचा विषय आहे़ ठरवून दिल्या प्रमाणे वृक्ष लागवड होत नसल्याने रोपे जातात कुठे? असा प्रश्न निर्माण होत आहे़ सामाजिक वनीकरण विभागाने पाथरी-सेलू, पाथरी-पोखर्णी या राज्य रस्तयांबरोबरच ग्रामीण भागात दुतर्फा वृक्ष लागवड केली होती़ सद्यस्थितीला अर्धे अधिक रोपे जळाली असून, यावर्षी देखील याच खड्ड्यात पुन्हा रोपे लावण्यात आली आहेत़


Web Title: Parbhani: A Fodder for Tree Plantation Campaign Officers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.