परभणी : अवकाळी पावसाने रस्त्याच्या दुरवस्थेत भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 00:24 IST2020-01-01T00:24:20+5:302020-01-01T00:24:24+5:30
मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास परभणी शहरासह परिसरामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने शहरासह परिसरात रस्त्यांच्या दुरवस्थेत भर पडली असून नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले.

परभणी : अवकाळी पावसाने रस्त्याच्या दुरवस्थेत भर
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास परभणी शहरासह परिसरामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने शहरासह परिसरात रस्त्यांच्या दुरवस्थेत भर पडली असून नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले.
जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने यापूर्वीच वर्तविला होता. या अंदाजानुसार दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून ढगाळ वातावरणामुळे दोन्ही दिवस सूर्यदर्शन झाले नाही. या काळात वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे झोंबणारी थंडी जिल्हावासियांना अनुभवावी लागत आहे.
दरम्यान, ३० डिसेंबर रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास हलक्या पावसाच्या सरी झाल्या. त्यानंतर ३१ डिसेंबरच्या पहाटे पाचच्या सुमारास जोरदार पाऊस बरसला. या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर आणि सखल भागांमध्ये पाणी साचले. या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामधुन वाहनधारकांना मार्ग काढावा लागला. प्रशासकीय इमारतीसमोरील रस्त्यावरील खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
तर जनता मार्केट परिसरात पावसाळ्यामध्ये निर्माण होणारी परिस्थिती मंगळवारीही निर्माण झाली. या भागातील नाल्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहिल्याने नाल्यांतील घाण रस्त्यावर आली होती. त्यामुळे हा रस्ताही दलदलमय झाला होता.