परभणी : विजेचा दाब वाढल्याने जळाली विविध उपकरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 00:56 IST2019-02-13T00:55:34+5:302019-02-13T00:56:10+5:30
अचानक उच्चदाबाने वीज पुरवठा झाल्याने शहरातील कारेगावरोड भागातील दत्तनगर येथील अनेक नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे जळाल्याचा प्रकार ११ फेब्रुवारी रोजी दुपारी घडला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये महावितरणच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला जात आहे.

परभणी : विजेचा दाब वाढल्याने जळाली विविध उपकरणे
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : अचानक उच्चदाबाने वीज पुरवठा झाल्याने शहरातील कारेगावरोड भागातील दत्तनगर येथील अनेक नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे जळाल्याचा प्रकार ११ फेब्रुवारी रोजी दुपारी घडला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये महावितरणच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला जात आहे.
येथील कारेगावरोड भागातील दत्तनगरात वीज पुरवठा करणाऱ्या डीपीवरुन वारंवार विजेचा दाब कमी-अधिक होत आहे. यापूर्वी देखील वीज प्रवाह उच्चदाबाने झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नागरिकांनी या संदर्भात महावितरणला माहिती दिल्यानंतरही हा बिघाड दुरुस्त केला नाही. परिणामी दररोज विजेचा लपंडाव आणि उच्चदाबाने वीज पुरवठा होत राहिला. सोमवारी दुपारी या भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता.
काही वेळानंतर हा वीज पुरवठा पूर्ववत झाला; परंतु, विजेचा दाब अचानक वाढल्याने परिसरातील अनेक घरांमधील विजेची उपकरणे जळाली आहेत. १० ते १२ जणांचे टीव्ही, काही जणांच्या घरातील फ्रीज, वॉशिंग मशीन, नळांच्या मोटारी, पंखे, ट्युब आणि सेटटॉप बॉक्स जळाले आहेत. या भागातील ८ ते १० जणांच्या घरात असा प्रकार घडला असून महावितरणच्या कारभाराविषयी रोष व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या प्रकाराविषयी महावितरणकडे रितसर तक्रार केली जाणार असून नुकसानग्रस्त नागरिकांना महावितरणने भरपाई द्यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.