परभणी :दुकानांसह कडब्याच्या गंजीला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:00 IST2019-04-29T00:00:16+5:302019-04-29T00:00:37+5:30
तालुक्यातील रेणापूर येथे कडब्याच्या गंजीला आणि शहरातील दोन दुकानांना लाग लागल्याची घटना रविवारी घडली आहे़

परभणी :दुकानांसह कडब्याच्या गंजीला आग
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी): तालुक्यातील रेणापूर येथे कडब्याच्या गंजीला आणि शहरातील दोन दुकानांना लाग लागल्याची घटना रविवारी घडली आहे़
तालुक्यात उन्हाचा पारा वाढत चालला असून, दररोज आगीच्या घटना घडत आहेत़ २८ एप्रिल रोजी पाथरी तालुक्यातील रेणापूर वसंत नगर तांडा येथील श्रीमंत किशन राठोड यांच्या शेतातील कडब्याच्या वळईला दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास आग लागली़ अग्निशमन दलाचे कर्मचारी खुर्रम खान, बळीराम गवळी, निखिलेश वाडेकर यांनी घटनास्थळी जाऊन ही आग आटोक्यात आणली़ आग विझवून अग्निशमन दलाची गाडी शहरात दाखल होताच २़२५ वाजता माजलगाव रस्त्यावरील बाबा फर्निचर आणि महाराष्ट्र गादीघर या दोन दुकानांना शॉर्टसर्किटमुळे आग लागली़ आगीत फर्निचर आणि इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले़ अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होवून ही आग आटोक्यात आणली़ या दोन्ही घटनांत जीवित हानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे़ तालुक्यात आगीच्या घटना वाढल्या असून, १५ दिवसांमध्ये १० ठिकाणी आग लागली आहे़ नगरपालिकेच्या अग्निशमन विभागात केवळ चार कर्मचारी नियुक्त असल्याने या कर्मचाऱ्यांना आग विझविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे़ पाथरी शहरासह मानवत, सोनपेठ आणि माजलगाव भागातही येथील अग्निशमन दल आग विझविण्याचे काम करीत आहे़