परभणीत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यावर १० लाखांची लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 10:10 IST2021-07-24T10:10:07+5:302021-07-24T10:10:51+5:30
Bribe case in Parabhani : २ कोटींची मागणी करून त्यातील १० लाखांची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकले.

परभणीत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यावर १० लाखांची लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा
परभणी : अपघाताच्या एका प्रकरणात मदत करण्यासाठी २ कोटींची मागणी करून त्यातील १० लाखांची रक्कम स्वीकारताना मुंबई येथील लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सेलू येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या अखत्यारित काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल यांच्यासह दोघांवर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (In Parbhani, a case has been registered against a sub-divisional police officer and an police employee for accepting a bribe of Rs 10 lakh for helping in accident case )
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने देण्यात आलेली माहिती अशी, सेलू पोलीस ठाण्यांतर्गत ३ मे २०२१ रोजी एका अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मयताच्या पत्नीसोबत तक्रारदाराची मोबाईलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने ९ जुलै रोजी सेलू येथील उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल यांनी तक्रारदारास त्यांच्या कार्यालयात बोलून, 'तुझी व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप मी ऐकली आहे. यातून तुला बाहेर पडायचे असेल तर तू मला दोन कोटी रुपये द्यावे, लागतील, असे सांगितले. तसेच कार्यालयात वारंवार बोलावून व फोन करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.
तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात २२ जुलै रोजी तक्रार दिली. या तक्रारीनुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी २३ जुलै रोजी तक्रारीची पडताळणी केली. त्यात उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल यांनी तक्रारदाराकडे गुन्ह्यात मदत करण्यासाठी २ कोटी रुपयांची मागणी करून तडजोडीत, त्यातील १ कोटी ५० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर काही वेळातच तक्रारदाराच्या भावाकडून उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल यांच्या कार्यालयाशी संलग्न मानवत पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी गणेश लक्ष्मणराव चव्हाण यांना १० लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. याप्रकरणी सेलू येथील पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल व पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण यांच्या विरोधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.