परभणी : सेलू पोलीस ठाण्याची इमारत मोडकळीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 00:05 IST2019-01-08T00:05:25+5:302019-01-08T00:05:47+5:30
शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या पोलीस ठाण्याची इमारत निजामकालीन असल्याने मोडकळीस आली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याचे कामकाज करण्यासाठी विविध अडचणींचा सामना अधिकारी व कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे. नवीन इमारतीचा प्रस्ताव लाल फितीत अडकल्याने अद्यावत इमारतीची प्रतीक्षा कायम आहे.

परभणी : सेलू पोलीस ठाण्याची इमारत मोडकळीस
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी) : शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या पोलीस ठाण्याची इमारत निजामकालीन असल्याने मोडकळीस आली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याचे कामकाज करण्यासाठी विविध अडचणींचा सामना अधिकारी व कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे. नवीन इमारतीचा प्रस्ताव लाल फितीत अडकल्याने अद्यावत इमारतीची प्रतीक्षा कायम आहे.
सेलू शहरामध्ये आठवडी बाजार परिसरात सेलू पोलीस स्टेशन आहे. निजामकाळात या पोलीस स्टेशनची छोटीशी इमारत बांधण्यात आली होती. कालांतराने शहराचा विस्तार वाढत गेला; परंतु, पोलीस स्टेशनची नवीन इमारत बांधण्यात आली नाही. सद्य स्थितीत सेलू पोलीस स्टेशनला ६०० चौरस मीटर जागा अस्तित्वात आहे. पोलीस निरीक्षक कक्ष, पुरुष व स्त्री बंदीगृह तसेच पोलीस स्टेशनच्या विविध विभागांचे कामकाज याच इमारतीत चालते. निजामकालीन इमारत असल्याने इमारतीची पडझड झाली आहे. तसेच पावसाळ्यात ही इमारत गळते. परिणामी, पोलीस स्टेशनचे कामकाज इतर खोल्यांमध्ये करावे लागते. काही वर्षापूर्वी इमारतीच्या लगतच सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरत्या स्वरुपात काही पत्र्याच्या खोल्या उपलब्ध करून दिल्या होत्या; परंतु, अद्ययावत बांधकाम नसल्याने इतर सोयी-सुविधा या खोल्यांमध्ये उपलब्ध करता येत नाहीत.
दोन वर्षापूर्वी इमारतीच्या समोर महिला पोलीस कर्मचाºयांसाठी अद्यावत कक्ष बांधण्यात आला आहे. मात्र पोलीस स्टेशनची इमारत मात्र जैसे थे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस स्टेशनची अद्ययावत इमारत बांधण्यासाठी ३ कोटी ९० लाखांचा प्रस्ताव तयार केला होता. यात सिमेंट रोड, ड्रेनेज, आवश्यक ते फर्निचर, परिसराचे सुशोभीकरण, विद्युतीकरण आदींचा प्रस्तावात समावेश करण्यात आला होता; परंतु, नवीन नियमानुसार ५०० चौरस मीटरच्या अधिक जागा असलेल्या प्रकल्पाच्या मंजुरीचे प्रस्ताव पोलीस गृह निर्माण कार्यालय यांच्याकडे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
त्यानंतर हा प्रस्ताव संबंधित विभागाकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, सद्य स्थितीत विद्युत उपकरणे हाताळताना पोलीस अधिकारी व कर्मचाºयांंना विविध समस्या निर्माण होत आहे. इमारत धोकादायक झाल्याने तीन वर्षापूर्वी पोलीस निरीक्षकांचा कक्ष इमारतीच्या समोर तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आला आहे.
पोलीस स्टेशनच्या अद्ययावत इमारतीचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला मुहूर्त मिळेल, अशी अपेक्षा आहे. वरिष्ठ स्तरावरून इमारतीच्या बांधकामासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी कर्मचाºयांतून होत आहे.
तात्पुरती दुरुस्ती
करणे शक्य
पोलीस स्टेशनची इमारत निजामकालीन असून ती कालबाह्यझाली आहे. अद्यावत इमारतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून संबंधित विभागाकडे वर्ग केला जाणार आहे. सद्य स्थितीत असणाºया इमारतीला तात्पुरत्या स्वरुपात दुुरुस्ती करून पावसाळ्यात इमारत गळू नये, यासाठी प्रयत्न करणार आहोत. सा.बां. विभागाने पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव तयार केला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रल्हाद कोरे यांनी दिली.