Parbhani: Brother's murder at Lima for trivial reasons | परभणी : लिमला येथे क्षुल्लक कारणावरून भावाचा खून
परभणी : लिमला येथे क्षुल्लक कारणावरून भावाचा खून

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): पैसे मागितल्याच्या क्षुल्लक कारणावरुन मोठ्या भावाने लहान भावाचा गळा आवळून खून केल्याची घटना १९ जानेवारी रोजी रात्री पुर्णा तालुक्यातील लिमला येथे घडली. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे.
गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पूर्णा तालुक्यातील लिमला येथील कृष्णा मारोतराव कुकर (२०) याने कीडनीच्या आजाराला कंटाळून १९ जानेवारी रोजी रात्री दगडवाडी शिवारातील शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती बालाजी सोपानराव कुकर यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यास दिली होती. त्यावरुन २० जानेवारी रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
या घटनेचा तपास करणारे जमादार हरिभाऊ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मात्र शंका आल्याने त्यांनी शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांना मृत्यूचे कारण विचारले असता कृष्णा कुकर याचा मृत्यू गळा आवळून झाल्याचा अभिप्राय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. त्यामुळे हरिभाऊ शिंदे यांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. या प्रकरणात मयत कृष्णा कुकर याची आई गोदावरीबाई मारोतराव कुकर यांचा जवाब नोंदविला. त्यात गोदावरीबाई यांनी सांगितले, १९ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास विलास व कृष्णा हे दोघे भाऊ जेवण करुन शेतात गेले होते. यावेळी मलाच सर्व कामे करावी लागतात, असे म्हणत कृष्णा याने मोठा भाऊ विलास यास पैशांची मागणी केली. तेव्हा तुझ्या किडणीच्या आजाराच्या गोळ्या आताच मागविल्या आहेत, सध्या माझ्याकडे पैसे नाहीत, असे विलास कुकर याने म्हणाल्यानंतर वाद निर्माण झाला. त्यातूनच विलास याने बैलगाडीला असलेली सूताची दोरी घेतली. दोघांत झालेल्या झटापटीत विलास याने कृष्णाला खाली पाडून त्याच्या गळ्याला दोरी बांधून जोराने गळफास दिला. त्यानंतर कृष्णा याचा मृतदेह लिंबाच्या झाडाला लटकविला, असे सांगितले. त्यामुळे या प्रकरणात तपासीक अंमलदार हरिभाऊ शिंदे यांनी या प्रकरणात सरकार पक्षातर्फे फिर्याद दिली असून, त्यावरुन २५ जानेवारी रोजी पहाटे साडेतीन वाजता विलास कुकर यांच्याविरुद्ध खून करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक वाय.एन. शेख अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Parbhani: Brother's murder at Lima for trivial reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.