परभणी : जागेच्या वादातून सख्ख्या भावाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:57 IST2018-12-31T00:57:08+5:302018-12-31T00:57:57+5:30
घराच्या जागेच्या वादातून सख्ख्या भावाचा खून केल्याची घटना २८ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. ३० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास शेतात मृतदेह आढळल्याने ही घटना उघडकीस आली.

परभणी : जागेच्या वादातून सख्ख्या भावाचा खून
लोकमत न्यूज नेटवर्क
चारठाणा (परभणी) : घराच्या जागेच्या वादातून सख्ख्या भावाचा खून केल्याची घटना २८ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. ३० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास शेतात मृतदेह आढळल्याने ही घटना उघडकीस आली.
जिंतूर तालुक्यातील सावरगाव येथील लिंबाजी बाबूराव सोनुळे व आबाजी बाबूराव सोनुळे या सख्या भावांमध्ये मागील काही दिवसांपासून घराच्या जागेसंदर्भात वाद होता. या वादातूनच २८ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास आबाजी सोनुळे याने आपला भाऊ लिंबाजी सोनुळे (७०) यांना सावरगाव शिवारातील शेतात काठी व दगडाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत लिंबाजी सोनुळे यांचा मृत्यू झाला. दरम्यान, ३० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास लिंबाजी सोनुळे यांचा मृतदेह शेतात आढळल्यानंतर ही घटना समोर आली.
उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार पांडे, बीट जमादार गुलाब भिसे, डी.डी. बुकरे, सतीश साठे, बळीराम इघारे यांनी पंचनामा केला. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी आबाजी सोनुळे यास त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे. जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.