परभणी : जात्याचा दगड डोक्यात घालून भावाचा केला खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 00:00 IST2019-11-27T23:59:58+5:302019-11-28T00:00:20+5:30
घरातील आर्थिक व्यवहारातून धाकट्या भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात जात्याचा दगड घालून खून केल्याची घटना जिंतूर तालुक्यातील कान्हा येथे घडली आहे़ पोलिसांनी आरोपी भावास अटक केली आहे़

परभणी : जात्याचा दगड डोक्यात घालून भावाचा केला खून
लोकमत न्यूज नेटवर्क
चारठाणा/बामणी (परभणी): घरातील आर्थिक व्यवहारातून धाकट्या भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात जात्याचा दगड घालून खून केल्याची घटना जिंतूर तालुक्यातील कान्हा येथे घडली आहे़ पोलिसांनी आरोपी भावास अटक केली आहे़
कान्हा येथील पांडूरंग व नारायण यांच्या वडिलांचे निधन काही महिन्यांपूर्वीच झाले होते़ वडिलांच्या निधनानंतर पांडूरंग विठ्ठल दुभडकर व त्यांचा लहान भाऊ नारायण विठ्ठल दुभडकर यांच्यात मागील दहा महिन्यांपासून आर्थिक व्यवहारातून वाद सुरू होता़
२७ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास दोघा भावांमध्ये याच वादातून बाचाबाची झाली़ त्यातून राग अनावर झाल्याने नारायण विठ्ठल दुभडकर याने पांडुरंग विठ्ठल दुभडकर (३१) याच्या डोक्यात जात्याचा दगड घातला़ त्यातच पांडुरंग याचा मृत्यू झाला़ हे कुटूंबिय आदिवासी समाजाचे असून गावापासून काही अंतरावर असलेल्या आखाड्यावर वास्तव्याला होते़
या घटनेची माहिती समजताच बामणी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले़ घटनेचा पंचनामा करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी नारायण दुभडकर (२८) यास ताब्यात घेतले आहे़ रात्री उशिरा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविला होता़ या प्रकरणी बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता़