परभणीत धाडसी चोरी ; यशोधननगरमध्ये भरदिवसा घर फोडून चोरट्यांनी ३० तोळे सोने लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 11:25 IST2017-10-25T11:20:08+5:302017-10-25T11:25:05+5:30
शहरातील यशोधन नगरात चोरट्यांनी भर दिवसा घरफोडी करून ३० तोळे सोने चोरुन नेल्याची घटना मंगळवारी (दि. २४) घडली़. दरम्यान, चोरीचा हा प्रकार मंगळवारी रात्री निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे़.

परभणीत धाडसी चोरी ; यशोधननगरमध्ये भरदिवसा घर फोडून चोरट्यांनी ३० तोळे सोने लांबविले
परभणी- शहरातील यशोधन नगरात चोरट्यांनी भर दिवसा घरफोडी करून ३० तोळे सोने चोरुन नेल्याची घटना मंगळवारी (दि. २४) घडली़. दरम्यान, चोरीचा हा प्रकार मंगळवारी रात्री निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे़. यशोधननगर भागात मागील एक वर्षामध्ये सुमारे १० ते १२ चो-या झाल्या आहेत़. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच या भागातील देशमुख यांच्या घरीही भर दिवसाच चोरी झाली होती़. भर दिवसा चोरी होण्याचा हा दुसरा प्रकार आहे़.
येथील पंचायत समितीमधील कर्मचारी प्रमोद गंगाराम अन्नपुर्वे यांचे यशोधन नगर भागात घर आहे़. दिवाळीच्या सणानिमित्त २४ आॅक्टोबर रोजी त्यांच्या घरातील सदस्य अंबाजोगाई येथे नातेवाईकांकडे गेले होते़. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास प्रमोद अन्नपुर्वे हे देखील घराला कुलूप लावून कार्यालयात गेले़. रात्री ९.३० च्या सुमारास ते घरी परतले तेव्हा चोरी झाल्याचा प्रकार समोर आला़. चोरट्यांनी टेरेसवरून खाली उतरत मागच्या दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश मिळविला़. घरातील सर्वसाहित्य अस्ताव्यस्त फेकून कपाटामध्ये ठेवलेले साधारणत: ३० तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविले आहेत़.
या घटनेनंतर अन्नपुर्वे यांनी रात्री उशिरा पोलिसांना माहिती दिली़ मंगळवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास नवा मोंढा पोलीस ठाण्याचे निरीक्षक व्ही़ व्ही़ श्रीमनवार यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले़ श्वान पथक आणि ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले़ परंतु, श्वान माग काढू शकला नाही़. याप्रकरणी अन्नपुर्वे यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे़.
चोरीच्या दहा ते बारा घटना
यशोधननगर भागात मागील एक वर्षामध्ये सुमारे १० ते १२ चो-या झाल्या आहेत़. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच या भागातील देशमुख यांच्या घरीही भर दिवसा चोरी झाली होती़. भर दिवसा चोरी होण्याचा हा दुसरा प्रकार आहे़. परंतु; पोलिसांना तपासात अजूनही यश आलेले नाही़.
सुयोग कॉलनीत चोरांचा धुमाकूळ
मंगळवारी रात्री यशोधन नगरालगत असलेल्या सुयोग कॉलनीतही चोरट्यांनी धुमाकूळ घातला़. या भागात राहणारे देवीदास गळाकाटू यांचे भाडेकरू रामदास खरवडे यांच्या घरी चोरी झाली.यात नगदी १० हजार रुपये आणि दागिने असा १५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला़. तसेच जायभाये यांच्या घरीही चोरट्यांनी चोरी केली़ विशेष म्हणजे जायभाये यांच्या घरी चोरी करताना घरात जागोजागी गुटखा खाऊन थुंकल्याचे दिसत आहे़.