परभणी : कारवाईच्या मागणीसाठी भीम टायगर सेनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 00:50 IST2019-09-12T00:48:55+5:302019-09-12T00:50:09+5:30
रमाई घरकूल आणि प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिक व्यवहार करून ठराविक लाभार्थ्यांनाच घरकुलाचा लाभ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी भीम टायगर सेनेने बुधवारी महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले़

परभणी : कारवाईच्या मागणीसाठी भीम टायगर सेनेचे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : रमाई घरकूल आणि प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिक व्यवहार करून ठराविक लाभार्थ्यांनाच घरकुलाचा लाभ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी भीम टायगर सेनेने बुधवारी महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले़
महानगरपालिकेच्या वतीने रमाई घरकूल योजना राबविली जाते़ ही योजना राबवित असताना मातोश्री रमाबाई आंबेडकरनगर, संजय गांधी नगर, भीमनगर, साखला प्लॉट, शंकरनगर या भागात शासकीय नियम समोर करून योजनेतील काही लाभार्थ्यांना घरकूल मंजूर केले नाही़ परंतु, हेच शासकीय नियम डावलून काही भागात मात्र महानगरपालिकेच्या रमाई घरकूल योजनेतील अधिकारी, कर्मचाºयांनी आर्थिक व्यवहार करून लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ दिला आहे़ या अधिकाºयांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी वारंवार करण्यात आली़ परंतु, केवळ आश्वासनेच देण्यात आली आहेत़ आतापर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही़ त्यामुळे भीम टायगर सेनेच्या वतीने याच प्रश्नांवर बुधवारी महानगरपालिकेसमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले़
दुपारी १़३० वाजेच्या सुमारास भीम टायगर सेनेचे पदाधिकारी, युवक मोठ्या संख्येने मनपा कार्यालयासमोर दाखल झाले़ यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली़ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त ठेवला होता़ दरम्यान, मनपाचे उपायुक्त गणपत जाधव, नगररचनाकार किरण फुटाणे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले़ या आंदोलनात युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़
दरम्यान, जोपर्यंत संबंधित अधिकारी, कर्मचाºयांच्या संपत्तीची चौकशी होवून कारवाई होत नाही, तोपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला़