परभणी : कुशल रणनीतीनेच बाजोरिया विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:12 AM2018-05-25T00:12:50+5:302018-05-25T00:12:50+5:30

परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत कुशल रणनीतीचा वापर करुन शिवसेनेचे उमेदवार विप्लव बाजोरिया यांनी विजय मिळविला आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीकडे असलेला हा मतदारसंघ शिवसेनेने पहिल्यांदाच निवडणूक लढवित आपल्याकडे खेचला आहे.

Parbhani: Bajoria won by skillful strategy | परभणी : कुशल रणनीतीनेच बाजोरिया विजयी

परभणी : कुशल रणनीतीनेच बाजोरिया विजयी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत कुशल रणनीतीचा वापर करुन शिवसेनेचे उमेदवार विप्लव बाजोरिया यांनी विजय मिळविला आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीकडे असलेला हा मतदारसंघ शिवसेनेने पहिल्यांदाच निवडणूक लढवित आपल्याकडे खेचला आहे.
परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर आतापर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. सहा वर्षांपूर्वी आघाडीतील जागा वाटपानुसार ही जागा काँग्रेसकडून राष्ट्रवादीकडे गेली. त्यानंतर सहा वर्षानंतर राष्ट्रवादीचे आ.बाबाजानी दुर्राणी यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राज्यस्तरावरुन घडलेल्या घडामोडीत परभणीची जागा राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा काँग्रेसकडे गेली. ऐनवेळी घडलेल्या या बदलामुळे मावळते आ.बाबाजानी दुर्राणी यांच्यासह राष्ट्रवादीचे बरेच कार्यकर्ते नाराज झाले होते; परंतु, त्यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसच्या नेत्यांना यश आले. मतदारसंघात काँग्रेसकडे १३५ व राष्ट्रवादीकडे १६२ मतदारांचे संख्याबळ होते. शिवाय घनदाट मित्र मंडळ, अपक्ष व अन्य काही सदस्यांनीही काँग्रेसला मदतीचा हात देण्याचे आश्वासन प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या सभेत दिले होते. त्यामुळे आघाडीच्या तुलनेत शिवसेना-भाजपा युतीकडे फारसे संख्याबळ नव्हते. शिवसेनेचे ९७ आणि भाजपाचे ५१ असे १४८ सदस्य असताना शिवसेनेचे खा.बंडू जाधव, अकोल्याचे आ.गोपीकिशन बाजोरिया यांनी कुशल रणनितीचा वापर करीत निवडणुकीच्या विजयाची गणिते आखली. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी २५१ मतांची गरज लागणार असल्याने त्यांनी ३५० मतांचे नियोजन केले. यासाठी प्रत्येक मतदाराची वैयक्तिक भेट घेतली. विनम्रतेने मतदानासाठी साकडे घातले. विशेष म्हणजे यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांशीही शिवसेनेच्या नेते मंडळींनी संपर्क साधला व तो संपर्क शेवटपर्यंत कायम ठेवला. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेला विजय मिळविणे सोपे झाले. याशिवाय आ.डॉ.राहुल पाटील, आ.मोहन फड, डॉ.विवेक नावंदर यांचीही बाजोरिया यांना मदत झाली. परिणामी परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ भाजपाकडे असताना तो शिवसेनेकडे सोडवून घेऊन पहिल्यांदाच या मतदारसंघात निवडणूक लढवून तो आपल्याकडे खेचण्यात बाजोरिया यांना यश मिळाले आहे.
शिवसेनेचा विचार मतदारांपर्यंत नेल्यानेच विजय -विप्लव बाजोरिया
शिवसेनेने ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण ही भूमिका कायम ठेवली आहे. पक्षाची भूमिका व आपली काम करण्याची पद्धत याबाबतची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविली. त्यामुळेच मतदारांनी आपल्यावर विश्वास टाकून विजयी केले, अशी प्रतिक्रिया आ.विप्लव बाजोरिया यांनी दिली. मतदारसंघातील प्रत्येक नगरसेवक, जि.प. सदस्य यांची कामे करण्यास प्राधान्य राहील.त्यासाठी आपण कटीबद्ध राहू, असेही ते म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद आणि खा.बंडू जाधव, आ.डॉ.राहुल पाटील, आ.डॉ.जयप्रकाश मुंदडा यांचे सहकार्य लाभल्यामुळेच विजय मिळाल्याचे बाजोरिया म्हणाले.
शिवसेनेची शहरात विजयी मिरवणूक
विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयापासून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत नवनिर्वाचित आमदार विप्लव बाजोरिया यांच्यासह नेते, कार्यकर्ते सहभागी होते. मिरवणूक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर बाजोरिया यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर शिवाजी चौकापर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या विजयाच्या घोषणा दिल्या.
शिवसेनेच्या विचारांचा विजय -राहुल पाटील
विधान परिषदेत विप्लव बाजोरिया यांचा झालेला विजय हा शिवसेनेच्या विचारांचा विजय आहे. शिवसैनिकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे व कुशल नियोजनामुळे हा विजय साकारता आला, असे आ.डॉ.राहुल पाटील यांनी सांगितले.
निकालानंतर शिवसेनेचा जिल्हा कचेरी परिसरात जल्लोष
विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु झाली. सकाळी ९.०५ वाजता निकालाचे चित्र स्पष्ट झाले; परंतु, अधिकृत माहिती सकाळी ९.१७ वाजता बाहेर आली. त्यानंतर शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार जल्लोष केला. यावेळी नवनिर्वाचित आ.विप्लव बाजोरिया यांचे संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते. शिवाय अकोल्यातूनही अनेक नगरसेवक येथे आल्याचे पहावयास मिळाले. या कार्यकर्त्यानी येथे जोरदार घोषणाबाजी केली.
खा.बंडू जाधव यांची केली व्यूहरचना
या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विप्लव बाजोरिया यांना निवडून आणण्यासाठी खा. बंडू जाधव यांनी विशेष व्यूहरचना आखली होती. परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यातील शिवसेना- भाजपासह अन्य पक्षांच्या बहुतांश मतदारांशीही त्यांची ओळख असल्याने त्यांनी या मतदारांशी संपर्क साधला. त्यांना वसमतचे आ.डॉ.जयप्रकाश मुंदडा, हिंगोलीचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांची मदत मिळाली. यातूनच त्यांनी दोन्ही जिल्ह्यातील शिवसेनेचे मतदार एकसंघ ठेवले. याशिवाय इतर पक्षाचे मतदारही आपल्याकडे खेचले. तसेच मतदानाच्या दिवशी त्यांनी जिल्ह्यातील विविध केंद्रांना भेटी देऊन यंत्रणेवर कटाक्ष ठेवला. परिणामी बाजोरिया यांचा विजय सुकर झाला.

Web Title: Parbhani: Bajoria won by skillful strategy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.