Parbhani: Another arrested in robbery case | परभणी : दरोडा प्रकरणातील आणखी एकास अटक
परभणी : दरोडा प्रकरणातील आणखी एकास अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी): तालुक्यातील सुहागन येथील सराफा व्यापाऱ्यास लुटल्याच्या प्रकरणात पोलिसांनी २२ सप्टेंबर रोजी वसमत तालुक्यातील हयातनगर येथून एका आरोपीस अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची संख्या तीन झाली आहे.
सराफा व्यापारी हनुमंत भोसले हे हयातनगर येथून दुकान बंद करुन पूर्णा तालुक्यातील सुहागन या गावाकडे येत असताना ८ सप्टेंबर रोजी त्यांना व त्यांच्या भावाला मारहाण करुन लुटल्याची घटना घडली होती. या घटनेत ५ दरोडेखोरांनी २ लाख २१ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिणे लुटले होते.
या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वीच दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील तिसºया आरोपीचा शोध सुरु असताना हा आरोपी हयातनगर येथे त्याच्या घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चंद्रकांत पवार, जमादार किशोर कवठेकर, विष्णू भिसे यांचे पथक २२ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास हयातनगर येथे पोहचले. आरोपी चांदू सुग्रीव जाधव यास त्याच्या घरातून ताब्यात घेतले. आरोपी चांदू जाधव यास न्यायालयाने २४ सप्टेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती फौजदार पवार यांनी दिली. पकडलेल्या आरोपीकडून लुटीच्या घटनेसह इतर अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.


Web Title: Parbhani: Another arrested in robbery case
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.