परभणी : ६० वर्षांनी आली लाल परी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 23:55 IST2019-08-13T23:55:24+5:302019-08-13T23:55:48+5:30
जिंतूर तालुक्यातील विजयनगर तांडा, घेवंडा, खरदडी या गावांमध्ये तब्बल ६० वर्षानंतर बससेवा सुरु झाल्यानंतर ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न निकाली निघाला आहे. आ.विजय भांबळे यांनी याकामी प्रयत्न केले. त्यास यश मिळाल्याने ग्रामस्थांत समाधान व्यक्त केले जात आहे.

परभणी : ६० वर्षांनी आली लाल परी
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिंतूर तालुक्यातील विजयनगर तांडा, घेवंडा, खरदडी या गावांमध्ये तब्बल ६० वर्षानंतर बससेवा सुरु झाल्यानंतर ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न निकाली निघाला आहे. आ.विजय भांबळे यांनी याकामी प्रयत्न केले. त्यास यश मिळाल्याने ग्रामस्थांत समाधान व्यक्त केले जात आहे.
विजयनगर तांडा, घेवंडा, खरदडी ही गावे दुर्गम भागातील असून रस्त्याचा प्रश्न निर्माण झाल्याने या गावात बससेवा पोहोचत नव्हती. परिणामी तालुक्याशी संपर्क करताना ग्रामस्थांना खाजगी वाहनांचा वापर करावा लागत असे. यागावांसाठी बससेवा सुरु करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी आ.विजय भांबळे यांच्याकडे केली. गावकऱ्यांचा प्रश्न आ.विजय भांबळे यांनी वरील गावांतील रस्त्यांचे डांबरीकरण करुन घेतले. रस्ते चांगले झाल्यामुळे बससेवा सुरु करण्यातील अडथळे दूर झाले होते. त्यामुळे बससेवेसाठी पाठपुरावा करण्यात आला. अखेर त्यासही यश आले. जिंतूर ते विजयनगर तांडा, घेवंडा, खरदडी, मांडवा, इटोली, अशी बससेवा सुरु करण्यात आली असून २ दिवसांपूर्वी गावात बस पोहोचल्यानंतर ग्रामस्थांनी या बससेवेचे जोरदार स्वागत केले. दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आ.विजय भांबळे यांचे ग्रामस्थांनी आभार मानले. यावेळी उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, तालुकाध्यक्ष मनोज थिटे, नगरसेवक उस्मान पठाण, शाहेद बेग मिर्झा, शिवाजी जाधव, शंकर गंजे, वाजीद भाई, हबीब शेख, शांतिलाल चोरडिया आदींची उपस्थिती होती.
दळणवळण : प्रश्न सुटल्याने समाधान
४जिंतूर तालुक्यातील घेवंडा तांडासह अनेक गावे दुर्गभ भागात आहेत. या गावांमध्ये दळणवळणाची कुठलीही सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना तालुक्याचे ठिकाण गाठण्यासाठी कसरत करावी लागत होती. खाजगी वाहनांच्या सहाय्याने तालुक्याचे ठिकाण गाठावे लागत.
४त्यामुळे वेळ आणि पैशांचा अपव्यय होत असे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही बससेवा सुरु नसल्याने आ.विजय भांबळे यांनी हा प्रश्न उचलून धरत आधी रस्त्यांचे डांबरीकरण केले आणि त्यानंतर बससेवा सुरु केली. त्यामुळे ग्रामस्थांनी गैरसोय दूर झाली अहे.