चारठाणा (जि. परभणी): ईदच्या सणानिमित्त बहिणीला भेटण्यासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. चारठाणा-मंठा मार्गावर रविवारी दुपारी कार आणि मिनी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात वसमत येथील पती, पत्नी आणि त्यांच्या ८ वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर इतर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण वसमत शहरावर शोककळा पसरली आहे.
समोरासमोर भीषण धडक
वसमत येथील सय्यद कुटुंब मंठा येथे राहणाऱ्या बहिणीला ईदनिमित्त भेटण्यासाठी कारने (क्र. एमएच १२ जीएफ ६२५९) निघाले होते. आज दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास चारठाणा-मंठा मार्गावर समोरून छत्रपती संभाजीनगरहून प्रवासी घेऊन येणाऱ्या मिनी ट्रॅव्हल्स आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, कार रस्त्याच्या कडेला फेकली जाऊन पूर्णपणे चक्काचूर झाली.
अपघातानंतर कारमध्ये अडकलेल्या जखमी आणि मृतांना स्थानिक नागरिकांनी बाहेर काढले. या दुर्दैवी घटनेत पती सय्यद आबिद महेबुब (वय ४०), पत्नी सय्यद सुमय्या आबिद (वय ३६) आणि त्यांच्या ८ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर, सय्यद इस्माईल महेबुब (वय ३५), सय्यद साहेदा आबिद, सय्यद जोहेरा अंजुम आबिद आणि सय्यद मिरब आबिद हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच मिनी ट्रॅव्हल्समधील सुमारे १३ प्रवाशांनाही दुखापत झाली आहे. सर्व जखमींवर जिंतूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दोन्ही वाहनांचा चक्काचूर
अपघात इतका भीषण होता की, कार आणि मिनी ट्रॅव्हल्स या दोन्ही वाहनांचा पूर्ण चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच चारठाणा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले.
दुर्दैवी योगायोग
ज्या बहिणीला भेटण्यासाठी हे कुटुंब आनंदाने निघाले होते, त्या बहिणीची भेट होण्यापूर्वीच हा भीषण अपघात झाला. भाऊ-बहिणीची भेट झालीच नाही आणि हा प्रवास अखेरचा ठरला, अशा भावना व्यक्त होत असून वसमत परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Web Summary : A family traveling to celebrate Eid died in a car accident near Charthana. The husband, wife, and their eight-year-old daughter died instantly. Four others were seriously injured. The incident has cast a pall of gloom over Vasmat.
Web Summary : चारठाणा के पास ईद मनाने जा रहे एक परिवार की कार दुर्घटना में मौत हो गई। पति, पत्नी और उनकी आठ वर्षीय बेटी की मौके पर ही मौत हो गई। चार अन्य गंभीर रूप से घायल हो गए। इस घटना से वसमत में शोक की लहर है।