टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 14:14 IST2025-04-29T14:12:47+5:302025-04-29T14:14:33+5:30
राज्य शासनाच्या सहसचिव चारुशीला चौधरी यांच्या स्वाक्षरीने जिल्हा नियोजन अधिकारी किशोरसिंह परदेशी एकतर्फी कार्यमुक्त

टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
परभणी: जिल्ह्याच्या विकास आढावा बैठकीत चर्चेत आलेल्या टक्केवारी प्रकरणामुळे जिल्हा नियोजन अधिकारी किशोरसिंह परदेशी यांना राज्य शासनाने प्रशासकीय कारणास्तव तत्काळ प्रभावाने कार्यमुक्त केल्याची कारवाई २८ एप्रिल रोजी करण्यात आली. या निर्णयामुळे जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.
शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत खासदार, आमदार व पालकमंत्री यांनी टक्केवारीच्या गंभीर आरोपांसह अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. विकास कामांपेक्षा कमिशनवरच भर दिला जात असल्याचे लोकप्रतिनिधींनी स्पष्ट केले. या आरोपांमुळे उपमुख्यमंत्री पवार यांनीही नाराजी व्यक्त करत, मी विकासासाठी निधी देतो, त्याबदल्यात एक रुपयाही घेत नाही, मग हे पैसे कोणासाठी गोळा केले जातात? असा थेट सवाल उपस्थित केला. या पार्श्वभूमीवर सोमवारी झालेल्या बैठकीनंतर राज्य शासनाच्या सहसचिव चारुशीला चौधरी यांच्या स्वाक्षरीने जिल्हा नियोजन अधिकारी परदेशी यांची एकतर्फी कार्यमुक्ती करण्यात आली असून, त्यांना मुंबई येथील अर्थ व सांख्यिकी संचालनालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राजू ढोकणे यांच्याकडे पदभार
परदेशी यांच्या कार्यमुक्तीनंतर सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी राजू ढोकणे यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत जिल्हा नियोजन अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. या घडामोडीमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे.