Parabhani ZP Result 2026: मतमोजणीला सुरुवात; टाकळी कुंभकर्णमध्ये उद्धवसेनेची आघाडी, पिंगळीत शिंदेसेना पुढे
By मारोती जुंबडे | Updated: February 9, 2026 11:22 IST2026-02-09T11:22:14+5:302026-02-09T11:22:33+5:30
पंचायत समिती गणांमध्येही मतमोजणी वेगाने सुरू असून प्रत्येक फेरीनंतर आकडेवारीत चढ-उतार होत आहेत.

Parabhani ZP Result 2026: मतमोजणीला सुरुवात; टाकळी कुंभकर्णमध्ये उद्धवसेनेची आघाडी, पिंगळीत शिंदेसेना पुढे
मारोती जुंबडे
परभणी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी १० वाजता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे सुरुवात झाली. एकूण ४० टेबलांवर सात फेऱ्यांत मतमोजणी होत असून सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये काही ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.
टाकळी कुंभकर्ण जिल्हा परिषद गटात उद्धव सेनेच्या प्रतीक्षा प्रभुलाल जयस्वाल यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतल्याचे चित्र आहे. भाजपच्या अश्विनी संदीप देशमुख यांच्याशी त्यांची थेट लढत असून दोन्ही गटांत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पहिल्या काही फेऱ्यांनंतर उद्धव सेनेला अनुकूल कल दिसत असल्याने परिसरात जल्लोषाचे वातावरण आहे.
दरम्यान, पिंगळी जिल्हा परिषद गटात शिंदे सेनेच्या पूजा अनिल सावंत या आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या महानंदा मुंजा गुरव व भाजपच्या स्नेहा प्रदीप पाटील वाघीकर यांच्यातही चुरस असली तरी सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये शिंदे सेनेने आघाडी घेतली आहे.
पंचायत समिती गणांमध्येही मतमोजणी वेगाने सुरू असून प्रत्येक फेरीनंतर आकडेवारीत चढ-उतार होत आहेत. मतमोजणी केंद्राबाहेर समर्थकांची गर्दी वाढत असून पोलिस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला आहे.
एकूण सात फेऱ्यांनंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार असल्याने उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची धाकधूक कायम आहे. पुढील फेऱ्यांमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.