Parabhani : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तीन बालके गंभीर जखमी; थोडक्यात जीव वाचला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 13:05 IST2025-12-22T13:02:51+5:302025-12-22T13:05:12+5:30
बालकांचा रडण्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेत कुत्र्यांच्या तावडीतून बालकांची सुटका केली.

Parabhani : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तीन बालके गंभीर जखमी; थोडक्यात जीव वाचला!
जिंतूर (जि. परभणी) : घरासमोर खेळणाऱ्या तीन बालकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. या मुलांवर शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.
हिदायतनगर वसाहतीमधील शेख रिजवान शेख हुसेन (वय ६), सय्यद तैमूर सय्यद फेरोज (५), जुनैरा तौफिक कुरेशी (१) हे तिघे रविवारी सायंकाळी घरासमोरील रस्त्यावर खेळत होते. दरम्यान, परिसरातील भटक्या कुत्र्यांनी या बालकांवर हल्ला चढवून त्यांना गंभीररीत्या जखमी केले. बालकांचा रडण्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेत कुत्र्यांच्या तावडीतून बालकांची सुटका केली. त्यांना शहरातील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान, भटक्या कुत्र्यांचा पालिकेने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.