Parabhani: सेलू न.प. मुख्याधिकाऱ्यांच्या 'खुर्चीचा कलगीतुरा'; २४ तासांत नियुक्ती रद्द, पुन्हा प्रभारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 16:11 IST2025-11-07T16:11:14+5:302025-11-07T16:11:56+5:30
त्र्यंबक कांबळे यांनी पदभार घेण्यापूर्वीच नियुक्ती रद्द झाल्याने चर्चेला उधाण; मुख्याधिकारी पद पुन्हा प्रभारी कदम यांच्याकडे

Parabhani: सेलू न.प. मुख्याधिकाऱ्यांच्या 'खुर्चीचा कलगीतुरा'; २४ तासांत नियुक्ती रद्द, पुन्हा प्रभारी
रेवणअप्पा साळेगावकर
सेलू (परभणी) : नगरपरिषद निवडणुका जवळ आल्याने प्रशासकीय हालचालींना वेग आला असताना, सेलू नगरपरिषदेत गेल्या दोन दिवसांत मुख्याधिकारी नियुक्त्यांच्या संदर्भात नाट्यमय घडामोडी घडल्या. गुरुवारी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने त्र्यंबक कांबळे यांची सेलू नगरपरिषद मुख्याधिकारीपदी ( गट ‘ब’ ) नियुक्ती केली होती. परंतु अवघ्या 24 तासांत शुक्रवारी जारी झालेल्या नव्या आदेशानुसार कांबळे यांची नियुक्ती रद्द करून तुकाराम कदम यांचीच पुन्हा प्रभारी मुख्याधिकारीपदी नेमणूक करण्यात आली आहे. ही उलटफेराची कारवाई निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याच्या चार दिवस आधी झाल्याने, स्थानिक राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.
निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार न. प. निवडणूक सुरूळीत पार पाडणेसाठी रिक्त असलेल्या पदावर तात्पुरत्या स्वरुपात मुख्याधिकारी याची नियुक्ती 6 नोव्हेंबर रोजी नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी- छापवाले यानी सेलू नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी त्र्यंबक कांबळे याची नियुक्ती केली. हे आदेश सोशल मिडीयावर रात्री उशीरा झळकताच कांबळे यांची नेमणूक चर्चेत आली होती. त्यानंतर नाट्यमय घडामोडी घडत अवघ्या 24 तासांत म्हणजे आज, शुक्रवारी उपसचिव प्रियांका कुलकर्णी- छापवाले यांच्याच सहीचे नव्याने आदेश निघत कांबळे यांची नियुक्ती रद्द करण्यात आली. तर परभणी मनपाचे सहाय्यक आयुक्त तुकाराम कदम यांनाच पुन्हा प्रभारी मुख्याधिकारीपदी तात्पुरती पदस्थापना देण्यात आल्याचे आदेशीत करण्यात आले आहे.
दरम्यान, कांबळे यांनी पदभार घेण्याच्या पूर्वीच नियुक्ती रद्द झाल्याचे आदेश धडकल्याने नगरपरिषद प्रशासनात धांदल उडाली. निवडणूक प्रक्रियापूर्व काळात प्रशासनात चाललेल्या या 'खुर्चीच्या कलगीतुऱ्या'त कोणते राजकारण आहे, याचीच चर्चा सेलू नगरपरिषदेत परिसर आणि शहरात सुरू आहे.