Parabhani: हृदयस्पर्शी! शिक्षकांच्या बदलीने ब्रह्मपुरीच्या झेडपी शाळेत विद्यार्थी ढसाढसा रडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 18:05 IST2025-09-09T18:04:50+5:302025-09-09T18:05:51+5:30
परभणी तालुक्यातील ब्रह्मपुरी जि.प. शाळेतील सहा शिक्षकांची बदली; विद्यार्थ्यांसह पालकांच्या अश्रूंचा फुटला बांध

Parabhani: हृदयस्पर्शी! शिक्षकांच्या बदलीने ब्रह्मपुरीच्या झेडपी शाळेत विद्यार्थी ढसाढसा रडले
- लक्ष्मण कच्छवे
दैठणा (जि. परभणी) : कुटुंबापेक्षा विद्यार्थ्यांचा अधिक वेळ हा शाळेत जातो. त्यामुळे शिक्षणाची गोडी निर्माण करणाऱ्या शिस्तप्रिय शिक्षकांचे विद्यार्थ्यांशी एक जिव्हाळ्याचे नाते तयार होते. सोमवारी परभणी तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील ६ शिक्षकांची बदली झाली. या शिक्षकांना मंगळवारी निरोप देताना विद्यार्थिनींच्या अश्रूंचा बांध फुटला. यावेळी शिक्षकांनाही अश्रू अनावर झाले. शिक्षक, विद्यार्थ्यांचे नाते दाखविणारा भावनिक व्हिडीओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ब्रह्मपुरी जिल्हा परिषद शाळेत इयत्ता १ ते ७ वीपर्यंत शाळा २७० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत सन २०१८ पासून १० शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी सहा शिक्षकांची नियमाप्रमाणे आठ वर्षांनंतर बदली झाली. शिक्षक एस.एस. रेवनवार, आर.एम. केंद्रे, एन.जी. पेंटे, एम.एच. चेनलवाड यांच्यासह शिक्षिका ए.बी. मुंडे, एस.एस. पवार यांना सोमवारी शाळेत निरोप देण्यात आला. या शिक्षकांनी आठ वर्षांत पालकांना साक्षरतेचे महत्त्व पटवून देत शाळेतील मुलींची पटसंख्या वाढवली. या काळात शिक्षक, विद्यार्थ्यांचे भावनिक नाते निर्माण झाले होते. मात्र, आठ वर्षांनंतर सोमवारी बदली झाल्याने मंगळवारी निरोप देताना विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी शिक्षक, पालक, ग्रामस्थांनाही गहिवरून आले. यावेळी शालेय समिती, ग्रामस्थांकडून शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी देवा राठोड, सदस्य नाझम शेख, माजी सरपंच बाळासाहेब चव्हाण,महेश चव्हाण यांची उपस्थिती होती.
शिक्षकांना निरोप देताना विद्यार्थी ढसाढसा रडले. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. #Parbhani#EmotionalMomentpic.twitter.com/TDTGzfsChx
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) September 9, 2025
भावनिक व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल
आठ वर्षांनंतर शिक्षकांच्या झालेल्या बदलीमुळे विद्यार्थिनी रडत रडत शिक्षिका ए.बी. मुंडे यांना बिलगून शाळेतच थांबण्याची विनवणी करीत होत्या. यावेळी मुंडे यांच्यासह तेथे उपस्थित असणाऱ्या पालकांनाही अश्रू अनावर झाले. याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.