Parabhani: बांधकाम मजूर मुलगा सेलूतील कालव्यात बुडाल्याची भीती; शोध मोहीम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 12:50 IST2025-12-18T12:50:19+5:302025-12-18T12:50:34+5:30
सेलू तालुक्यातील सोनवटी येथील दुर्दैवी घटना; पोलिसांसह, ग्रामस्थ, नातेवाईकांची शोध मोहिम सुरू

Parabhani: बांधकाम मजूर मुलगा सेलूतील कालव्यात बुडाल्याची भीती; शोध मोहीम सुरू
-रेवणअप्पा साळेगावकर
सेलू (परभणी): घराचा भार उचलण्यासाठी पदरात कष्ट घेऊन कामावर गेलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा निम्न दुधना डाव्या कालव्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. साजीद मजीद शेख (रा. राजमोहल्ला, सेलू) असे या मुलाचे नाव असून, बुधवारी सायंकाळपासून तो बेपत्ता आहे. पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने कालव्याच्या पात्रात शोध घेतला जात आहे, मात्र अद्याप त्याचा कोणताही थांगपत्ता लागलेला नाही.
साजीद हा सेलूतील राजमोहल्ला येथील रहिवासी असून तो सोनवटी येथे व्यंकटी धुमाळ यांच्या बांधकामावर मजुरीचे काम करत होता. बुधवारी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास तो गावालगत असलेल्या निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालवा परिसरात शौचास गेला होता. बराच वेळ झाला तरी तो कामाच्या ठिकाणी परतला नाही, त्यामुळे शोधाशोध सुरू झाली. कालव्याच्या काठावर त्याचे काही खुणा आढळल्याने तो पाण्यात वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला.
पोलीस आणि ग्रामस्थांची शोधमोहीम
सोनवटीचे पोलीस पाटील माणिकराव सोळंके यांनी तातडीने या घटनेची माहिती सेलू पोलीस ठाण्यात दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, पोलीस उपनिरीक्षक राऊत, हवालदार सूर्यवंशी, पोलीस शिपाई आघाव, डुबे यांनी घटनास्थळी धाव घेतली. कालव्याच्या पात्रात पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने शोध घेण्यात अडथळे येत आहेत. हातनूरचे पोलीस पाटील रामचंद्र पारवे यांच्यासह ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी रात्रभर शोध घेतला, पण साजीदचा शोध लागला नाही.
कष्टाळू मुलाच्या चिंतेने कुटुंब व्याकुळ
अवघ्या १७ वर्षांचा साजीद कष्टाचे काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. त्याच्या अशा अचानक बेपत्ता होण्याने राजमोहल्ला आणि सोनवटी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रशासन स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने पुन्हा एकदा शोध मोहीम राबवणार आहे.