ऑक्सिजन, रेमडेसिविर आणि लसही वेटिंगवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:16 IST2021-04-18T04:16:24+5:302021-04-18T04:16:24+5:30
परभणी : कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढलेल्या संख्येबरोबरच जिल्ह्याला आता नव्या संकटाने ग्रासले आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन आणि कोरोना प्रतिबंधक लसीचा ...

ऑक्सिजन, रेमडेसिविर आणि लसही वेटिंगवर
परभणी : कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढलेल्या संख्येबरोबरच जिल्ह्याला आता नव्या संकटाने ग्रासले आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन आणि कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा जाणवत असल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी धावपळ होत आहे.
जिल्ह्यात मागील आठवड्यात मोठ्या संख्येने रुग्णांची नोंद झाली. या रुग्णांवर उपचार करताना आरोग्य यंत्रणा कमी पडत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्यात आली असली तरी प्रत्यक्षात ऑक्सिजनचा तुटवडा प्रशासनाला जाणवू लागला आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयातून नोंदणी होत असलेले रेमडेसिविर इंजेक्शन मागणीच्या प्रमाणात प्राप्त होत नसल्याने या इंजेक्शनसाठी नातेवाईकांची शहरातील औषधी दुकानांवर धावपळ होत आहे. ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाने मागणी नोंदविली आहे; परंतु त्या प्रमाणात पुरवठा होत नसल्याची स्थिती आहे. दुसरीकडे लसीचा साठाही संपुष्टात आल्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरणही बंद पडले आहे. सध्या उपलब्ध असलेली लस देण्याचे काम सुरू आहे; परंतु नवीन लस उपलब्ध झाल्याशिवाय या कामालाही गती येणार नाही. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना आरोग्य यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. जिल्हा प्रशासनाने ऑक्सिजनसह रेमडेसिविर इंजेक्शन आणि लसीच्या साठ्याची मागणी नोंदविली आहे; परंतु अपेक्षित साठा अद्याप तरी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे कोरोनाच्या रुग्ण संख्या वाढीबरोबरच प्रशासनाला औषधी साठा उपलब्ध करण्यासाठीही कसरत करावी लागत आहे.
२५ केएल ऑक्सिजनची कमतरता
जिल्ह्यात ५० केएल ऑक्सिजन साठविण्याची क्षमता आहे; परंतु प्रत्यक्षात २५ केएल साठाच उपलब्ध आहे. निम्मा साठा उपलब्ध नसल्याने कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्याचप्रमाणे १ हजार ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध असताना त्यातील केवळ ३०० सिलिंडर भरलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
दररोज १०० रेमडेसिविरचा तुटवडा
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांमधून दररोज ५०० रेमडेसिविर इंजेक्शनची नोंदणी होत आहे. परंतु प्रत्यक्षात ४०० इंजेक्शनचा जिल्ह्याला पुरवठा होत आहे. त्यामुळे दररोज १०० इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होत असून, त्यामुळे या इंजेक्शनसाठी रुग्णांची धावपळ होत आहे. मागील आठवडाभरापासून रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. हे इंजेक्शन मिळविण्यासाठी प्रशासनाकडून दररोज पाठपुरावा केला जात आहे. इंजेक्शन देण्यासंदर्भातही नियोजन लावण्यात आले आहे. मात्र, सध्या तरी मुबलक प्रमाणात साठा मिळालेला नाही.
प्रतिबंधक लसीचा साठा संपला
जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीचा साठाही संपला आहे. आतापर्यंत १ लाख नागरिकांना लसीकरण झाले आहे. उर्वरित नागरिकांच्या लसीकरणासाठी जिल्ह्याला किमान २५ हजार ७०९ लसींची आवश्यकता आहे. सध्या कोव्हॅक्सिनच्या ६ हजार १७० लसीचा पुरवठा झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. जिल्ह्यात ५२ केंद्रांवरून लसीकरण केले जात आहे. मात्र, लसीअभावी बहुतांश केंद्रे बंद ठेवण्यात आली आहेत.