विदर्भ सीमेवर उभारली चौकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:20 IST2021-02-25T04:20:55+5:302021-02-25T04:20:55+5:30
येलदरी : मराठवाडा आणि विदर्भाची सीमा असलेल्या येलदरी येथील धरण परिसरामध्ये प्रशासनाने नाकाबंदी चौकी उभारली खरी, परंतु याठिकाणी कर्मचाऱ्यांचा ...

विदर्भ सीमेवर उभारली चौकी
येलदरी : मराठवाडा आणि विदर्भाची सीमा असलेल्या येलदरी येथील धरण परिसरामध्ये प्रशासनाने नाकाबंदी चौकी उभारली खरी, परंतु याठिकाणी कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने अनेक प्रवासी विनातपासणी मराठवाड्यात दाखल होत आहेत.
विदर्भात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी विदर्भातून येणाऱ्या खासगी व सार्वजनिक बससेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर येलदरी धरणाच्या परिसरात मंगळवारी रात्री तपासणीसाठी चौकी स्थापन करण्यात आली. जिंतूर आरोग्य विभाग आणि पोलीस विभागाच्या वतीने या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या मार्गाने मराठवाड्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात एक कर्मचारी किती जणांची स्वॅब तपासणी करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेकजण विनातपासणी करताच मराठवाड्यात प्रवेश करीत आहेत. सायंकाळपर्यंत ही चौकी कार्यरत असते. त्यानंतर मात्र एका पोलीस कर्मचाऱ्यावर चौकीचा कारभार चालतो. त्यामुळे चौकी उभारल्यानंतर ही प्रवासी तपासणी विना मराठवाड्यात दाखल होत आहेत.
वाहने अडवून तपासणी
येलदरी येथील चौकीमध्ये महसूल विभागाचा एक कर्मचारी, एक पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील आणि आरोग्य विभागातर्फे एक कर्मचारी अशा चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या कर्मचाऱ्यांना कोणतीही सुरक्षा किट उपलब्ध करून दिले नाही. केवळ हातात घालण्यासाठी ग्लोज देऊन कोरोनासाठी लागणाऱ्या लाळेचे नमुने घेण्याची जबाबदारी प्रशासनाने या कर्मचाऱ्यांवर दिली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
सीमेवर होत आहे गर्दी
विदर्भातील वाहतूक बंद केल्यानंतरही येथून जिंतूरकडे जाणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. बाजारपेठ, लग्न समारंभ, मंदिरात दर्शन यासह इतर वेगवेगळ्या कारणावरून प्रवासी या मार्गावरून प्रवास करीत आहेत. विशेष म्हणजे, अनेक प्रवासी विनामास्क असल्याने प्रशासन केवळ रस्ते अडवून नेमके काय साध्य करीत आहे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.