बियाणांसाठी २३ हजार अर्जांतून ६ हजार शेतकऱ्यांचेच नशीब !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:13 IST2021-06-05T04:13:47+5:302021-06-05T04:13:47+5:30
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी किमतीच्या ५० टक्के अनुदान देण्यात येते. यासाठी या शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे बंधनकारक करण्यात ...

बियाणांसाठी २३ हजार अर्जांतून ६ हजार शेतकऱ्यांचेच नशीब !
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी किमतीच्या ५० टक्के अनुदान देण्यात येते. यासाठी या शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील २२ हजार ८७८ शेतकऱ्यांनी अनुदानित बियाणांसाठी अर्ज केले होते. जिल्ह्याला फक्त ६ हजार शेकऱ्यांनाच अनुदानित बियाणे देण्याचे उद्दिष्ट असल्याने कृषी विभागाच्या वतीने लाभार्थी शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली. त्यानुसार प्रत्येक तालुक्यातील लाभार्थी निवडण्यात आले आहेत. असे असले तरी जवळपास १६ हजार शेतकऱ्यांना हे बियाणे मिळणार नसल्याने त्यांच्यामध्ये निराशेचे वातावरण आहे.
अर्ज केलेल्या सर्वांना लाभ मिळावा
गेल्या ३ वर्षभरापासून शेतकऱ्यांवर अनेक वेळा संकटे आली आहेत. गेल्या वर्षी बोगस बियाणांमुळे फसवणूक झाली आहे. त्यामुळे शासनाने यावर्षी अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे दिले पाहिजे.
- दासराव काळे, शेतकरी
तुटपुंजे अनुदान मिळत असल्याने निराशा
शासनाकडून बियाणांसाठी केवळ ३४० रुपयांचे तुटपुंजे अनुदान देण्यात येत आहे. ही निराशाजनक बाब आहे. त्यामुळे शासनाने एकतर १०० टक्के अनुदानित बियाणे द्यावे किंवा योजनाच बंद करावी.
- सतीश जांभळे, शेतकरी
शासनाची योजना केवळ दिखाव्यापुरतीच
शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी १०० टक्के अनुदानित बियाणे दिले पाहिजे. कारण त्यांनाच मदतीची गरज आहे; परंतु या गटाचा विचार न करताच ही योजना राबविण्यात येत आहे. यामुळे हा गट दुर्लक्षित राहिला आहे.
- अनिल साबळे, शेतकरी