केवळ अर्धा टक्काच पीक कर्ज वाटप; बँकांच्या उदासीनतेने दरवर्षी घटतेय टक्केवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 04:32 PM2020-11-14T16:32:30+5:302020-11-14T16:45:39+5:30

केवळ ५१३ शेतकऱ्यांनाच लाभ

Only half a percent crop loan allocation; The declining percentage every year due to the depression of the banks | केवळ अर्धा टक्काच पीक कर्ज वाटप; बँकांच्या उदासीनतेने दरवर्षी घटतेय टक्केवारी

केवळ अर्धा टक्काच पीक कर्ज वाटप; बँकांच्या उदासीनतेने दरवर्षी घटतेय टक्केवारी

Next
ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज

- मारोती जुंबडे

परभणी : यावर्षीच्या रबी हंगामात जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांना ४५१ कोटी ८७ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ९ नोव्हेंबरपर्यंत बँकांच्या उदासिन भूमिकेमुळे केवळ ०.४२ टक्केच पीक कर्ज वाटप करून ५१३ शेतकऱ्यांनाच लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे खरीप हंगामा पाठोपाठ रबी हंगामातही पीक कर्जाचे उद्दिष्ट बँकांकडून पूर्ण करण्यात येते की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हा प्रशासनाने १६५५ कोटी २० लाख रुपयांचे शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट राष्ट्रीयकृत बँकांना दिले होते. या बँकांनी मात्र केवळ ६४.५८ टक्के पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करीत १ लाख ५४ हजार ८७५ शेतकऱ्यांना लाभ दिला. त्यामुळे अर्ध्याहून अधिक शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहिले होते. खरीप हंगामात हातातोंडाशी आलेले पीक सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातून गेले. त्यामुळे आता रबी हंगामातील हरभरा, ज्वारी व गव्हाची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची नितांत आवश्यकता आहे. 

जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन यावर्षी सर्वाधिक ४५१ कोटी ८७ लाख रुपये पीक कर्जाचे उद्दिष्ट राष्ट्रीयकृत बँकांना दिले आहे. त्यामुळे शेतकरी सध्या दिवाळी सणाच्या धामधुमीत बँकांच्या दारामध्ये रबी हंगामाचे पीक कर्ज घेण्यासाठी उभा आहे; परंतु, बँकांनी आतापर्यंत केवळ ०.४२ टक्केच पीक कर्ज वाटप करीत ५१३ शेतकऱ्यांनाच पीक कर्जाचा लाभ दिला आहे. यामध्ये व्यावसायिक बँकांनी ३१३ शेतकऱ्यांना २ कोटी ५७ लाखांचे पीक कर्ज वाटप करीत ०.९९ टक्के उद्दिष्ट गाठले आहे. खाजगी बँकांनी ९९ शेतकऱ्यांना १ कोटी ६० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करीत ४.५९ टक्के उद्दिष्ट गाठले आहे. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेने ९७ शेतकऱ्यांना ४४ लाखांचे पीक कर्ज वाटप करीत बँकेला दिलेल्या उद्दिष्टापैकी केवळ ०.४० टक्केच पीक कर्ज वाटप केले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँकेला आतापर्यंत रबी हंगामातील पीक कर्ज वाटपास मुहूर्तच मिळाला नसल्याचे दिसून येत आहे.

दरवर्षी घटतेय टक्केवारी
२०१६-१७ हे वर्ष सोडले तर दरवर्षी जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाच्या टक्केवारीचा आलेख घसरताच राहिला आहे. २०१६-१७ मध्ये १४०८ कोटी ८६ लाखांचे वाटप करीत १०८ टक्के पीक कर्जाचे वाटप केले होते. त्यानंतर २०१९-२० या वर्षात २२ टक्केचपीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यानंतर २०२०-२१ मध्ये ६४.५८ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले. सध्या रबी हंगामात तर ०.४२ टक्केच पीक कर्ज आतापर्यंत वाटप केले आहे. त्यामुळे दरवर्षी पीक कर्ज वाटपाची टक्केवारी घसरत आहे.

Web Title: Only half a percent crop loan allocation; The declining percentage every year due to the depression of the banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app