वर्षभरात केवळ चार थॅलेसेमिया बालकांचा जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:17 AM2021-05-09T04:17:46+5:302021-05-09T04:17:46+5:30

परभणी : थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुपच्या माध्यमातून मागील सहा वर्षांपासून जिल्ह्यात जनजागृती व उपचार कार्य सुरू केले असून, त्याचा परिणाम ...

Only four thalassemia babies are born in a year | वर्षभरात केवळ चार थॅलेसेमिया बालकांचा जन्म

वर्षभरात केवळ चार थॅलेसेमिया बालकांचा जन्म

Next

परभणी : थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुपच्या माध्यमातून मागील सहा वर्षांपासून जिल्ह्यात जनजागृती व उपचार कार्य सुरू केले असून, त्याचा परिणाम दिसू लागला आहे. जिल्ह्यातील थॅलेसेमिया मेजर बालकांच्या जन्माचे प्रमाण घटले असून, मागील वर्षात केवळ ४ मेजर बालकांचा जन्म झाला आहे.

थॅलेसेमिया हा रक्ताचा गंभीर आजार आहे. बाळ जन्माला आल्यानंतर साधारणत: एक वर्षात या आजाराचे निदान होते. त्या वेळपासून प्रत्येक १५ दिवसांना बाळाला रक्त द्यावे लागते. तरच ते जिवंत राहू शकते. त्यामुळे असे बाळ जन्माला येऊ नये, यासाठी लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांनी सहा वर्षांपूर्वी थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुपची स्थापना केली. या ग्रुपच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थी, लग्नसोहळे या ठिकाणी जनजागृती करून थॅलॅसिमिया तपासणी करणे का गरजेचे आहे? याविषयी मार्गदर्शन केले.

जिल्ह्यात थॅलेसेमिया या गंभीर आजाराने ग्रस्त असलेली १२५ बालके आहेत. या बालकांना प्रत्येक महिन्यात दोन वेळा रक्तसंक्रमण करावे लागते. त्यासोबतच पाच ते सहा हजार रुपयांची औषधेही लागतता. या बालकांना जगविण्यासाठी आणि त्यांचा औषधांचा खर्च उचलण्यासाठी थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुपने शासन पातळीवर प्रयत्न केले. त्यामुळे या वर्षी सहा जिल्ह्यांतील बालकांना औषधी मोफत दिली जात आहेत.

थॅलेसेमिया या आजारावर कायमस्वरूपी उपचार नसल्याने थॅलेसेमिया बालके जन्माला येऊ नयेत, हीच प्रतिबंधात्मक काळजी ठरणार आहे. त्यामुळे अशी बालके जन्माला येऊ नयेत यासाठी काय केले पाहिजे, याबाबत थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुप मार्गदर्शन करीत आहे. सहा वर्षांपासून सातत्याने केलेल्या मार्गदर्शनामुळे मागील वर्षी थॅलेसेमियाग्रस्त बालकांच्या जन्माचे प्रमाण घटले आहे. मागील वर्षी केवळ ४ बालके थॅलेसेमियाग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले असून, हे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती पिंपळगावकर यांनी दिली.

जिंतूरमध्ये २२ बालकांसाठी नियमित रक्त

जिल्ह्यातील १२५ थॅलेसेमियाग्रस्त बालकांना कोरोना संसर्ग काळात रक्त मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल, ही बाब लक्षात घेऊन या बालकांसाठी तालुका स्तरावर रक्तसाठा उपलब्ध करावा, असा आग्रह सपोर्ट ग्रुपने केला. त्यातून जिंतूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात डॉ. रविकिरण चांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अर्चना भायेकर यांनी पुढाकार घेऊन दीड वर्षापासून २२ बालकांसाठी नियमितपणे रक्तसंक्रमण करणे सुरू केले आहे. तसेच रक्तविकार तज्ज्ञांमार्फत या बालकांची तपासणी केली जात आहे. त्यातून बालकांचे आयुष्यमान उंचावण्याचा प्रयत्न होत आहे.

Web Title: Only four thalassemia babies are born in a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.