जिल्ह्यात २७ टक्केच पीक कर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:13 IST2021-07-16T04:13:48+5:302021-07-16T04:13:48+5:30
परभणी : खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २७ टक्के पीक कर्ज वाटप झाले असून, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ...

जिल्ह्यात २७ टक्केच पीक कर्ज वाटप
परभणी : खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २७ टक्के पीक कर्ज वाटप झाले असून, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कर्ज वाटपाचे उद्दिष्ट अपूर्ण राहण्याची शक्यता आहे.
खरीप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने दरवर्षी जिल्हा प्रशासन बँकांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करून देते. मात्र, मागील तीन वर्षांपासून बँका उद्दिष्ट पूर्ण करीत नाहीत. या वर्षीदेखील अशीच परिस्थिती आहे.
या वर्षीच्या खरीप हंगामात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत व्यापारी बँक आणि ग्रामीण बँकांना १२१३ कोटी २१ लाख रुपये कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. ९ जुलैअखेर जिल्ह्यातील बँकांनी ५९ हजार ६०८ शेतकऱ्यांना ३२७ कोटी ७ लाख ७८ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत २७ टक्के कर्जवाटप झाले आहे. खरीप हंगामामध्ये पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैशांची आवश्यकता भासते. जिल्ह्यात जवळपास पेरण्या पूर्ण झाल्या असून आता पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. असे असताना बँकांनी मात्र त्यांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट अद्याप पूर्ण केले नाही. आणखी ७० टक्के कर्ज वाटप बँकांना करावयाचे असून, शेतकरी कर्जाची मागणी करीत असतानाही त्यात त्रुटी काढून कर्ज वाटप करण्यास टाळाटाळ होत आहे. मागील वर्षी राज्य शासनाने कर्ज माफी योजना राबविली असून, यात अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे. त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या कमी असल्याने यंदा बँकांकडून पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होईल, अशी आशा होती. मात्र, सध्याची आकडेवारी पाहता या वर्षीदेखील बँक प्रशासनाकडून उद्दिष्टपूर्ती होण्याची शक्यता कमीच दिसत आहे.
जिल्हा बँकेने केले उद्दिष्ट पूर्ण
राष्ट्रीयीकृत बँका आणि ग्रामीण बँकेचे कर्जवाटप संथगतीने होत असले तरी परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १४२ कोटी ८२ लाख ७३ हजार रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. या बँकेने आतापर्यंत १५० कोटी ७२ लाख ८७ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत १०५ टक्के काम बँकेने पूर्ण केले आहे. उर्वरित बँका मात्र कर्जवाटपात मागे पडल्या आहेत.
शेतकऱ्यांना मिळणार
व्याज सवलतीचा लाभ
पीक कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नियमित कर्ज परतफेड करून कर्जाचे नूतनीकरण करावे. तसेच शासनाच्या व्याज सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुनील हट्टेकर आणि जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केले आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार खरीप हंगामात २०२१-२२ मध्ये ३ लाख रुपयांपर्यंतच्या अल्पमुदत पीक कर्जासाठी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत ३ टक्के व्याज परतावा योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ३ रुपयांपर्यंतच्या अल्पमुदत पीक कर्जासाठी केंद्र शासनाचे ३ टक्के व राज्यशासनाच्या योजनेंतर्गत ३ टक्के व्याज सवलत विचारात घेतल्यानंतर शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध होऊ शकते. तेव्हा या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.