Only 205 character certificates distributed in Parbhani district in lockdown | लॉकडाऊनमध्ये परभणी जिल्ह्यात अवघी 205 चारित्र्य प्रमाणपत्रे वितरीत

लॉकडाऊनमध्ये परभणी जिल्ह्यात अवघी 205 चारित्र्य प्रमाणपत्रे वितरीत

ठळक मुद्देअनलॉकनंतर वाढला ओघ आठ महिन्यांत १६५४ प्रमाणपत्र

परभणी : लॉकडाऊन काळातील एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांमध्ये संपूर्ण व्यवहारच ठप्प असल्याने त्याचा परिणाम चारित्र्य प्रमाणपत्राच्या कामावर झाला आहे. तीन महिन्यांमध्ये केवळ २०५ जणांचे चारित्र्य प्रमाणपत्र ऑनलाईन वितरित करण्यात आले.

कंपनी, एखादा उद्याेग, कर्मचारी भरती, परदेशवारी आणि न्यायालयीन व निवडणुकीसाठी चारित्र्य प्रमाणपत्राची आवश्यकता असते. एखाद्या कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यापूर्वी पोलिसांमार्फत संबंधित कर्मचारी अथवा कामगारांची चारित्र्य पडताळणी करण्यात येते. मात्र यावर्षात कोरोनाचे संकट निर्माण झाल्याने त्याचा परिणाम यावर झाला.  परिणामी अनेक व्यवसाय ठप्प पडले, कामगारांना देखील कमी करण्यात आले. त्यामुळे चारित्र्य प्रमाणपत्र देण्याची संख्याही घटली. आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील एमआयडीसी भागातील विविध उद्योग पूर्वपदावर आले असून, परप्रांतीय कामगार दाखल होत आहेत. त्यामुळे चारित्र्यप्रमाणपत्रांची संख्या वाढू लागली आहे. सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक ४९९ प्रमाणपत्र काढण्यात आले आहेत. त्यामुळे आता प्रमाणपत्र काढणाऱ्यांची संख्या तुलनेने वाढली आहे. 

दोन वर्षांत ७५०० कामगारांची पडताळणी
जिल्ह्यात ऑनलाईन पद्धतीने दाखल झालेल्या अर्जानुसार १ जानेवारी २०१८ ते १ जानेवारी २०१९ या काळात एकूण ७ हजार ४७० जणांची चारित्र्य पडताळणी करण्यात आली. या नागरिकांना पोलीस अधीक्षक कार्यालयातून प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. त्या तुलनेत यावर्षी प्रमाणपत्रांची संख्या घटली आहे. 

पडताळणीसाठी असा करा अर्ज
ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे. अर्ज अपलोड झाल्यानंतर तो थेट संबंधित पोलीस ठाण्यात जातो. तेथे चारित्र्य पडताळणी झाल्यानंतर हा अर्ज पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे येतो. या ठिकाणी जिल्ह्यातील डाटा तपासला जातो.

चारित्र्यप्रमाणपत्रासाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित व्यक्तींवर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि सीसीटीएनएसच्या सहाय्याने जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत का, याची तपासणी केली जाते. त्यानंतर प्रमाणपत्र वितरित होते.
- संदीपान शेळके, पोलीस निरीक्षक

अनलॉकच्या प्रक्रियेनंतर कामगार जिल्ह्यात परतण्यास सुरुवात झाली आहे. काही स्थानिक कामगारांनीही पुन्हा त्यांचे काम सुरू केले आहे. अशा वेळी त्या सर्व कामगारांची चारित्र्य पडताळणी करून त्यांना कामगावर रुजू करून घेतले आहे.  
- आनंद भगत, उद्योजक

Web Title: Only 205 character certificates distributed in Parbhani district in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.