ऑनलाइन शिक्षण अन् मोबाइलने लावला मुलांना चष्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:14 IST2021-07-17T04:14:52+5:302021-07-17T04:14:52+5:30
कोरोनामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या. मात्र, ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आला आहे. यामुळे शहरी भागात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांच्या शाळा, ...

ऑनलाइन शिक्षण अन् मोबाइलने लावला मुलांना चष्मा
कोरोनामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या. मात्र, ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आला आहे. यामुळे शहरी भागात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांच्या शाळा, तसेच अन्य शैक्षणिक वर्गाच्या तासिका मोबाइलवर, लॅपटॉपवर ऑनलाइन पद्धतीने सुरू झाल्या. यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये व अभ्यासात खंड पडू नये यासाठी पालकांनी ऑनलाइन क्लासला पसंती दिली. मात्र, या ऑनलाइन शिकवणीमुळे काही विद्यार्थ्यांना लहान वयातच डोळ्यांचे आजार जडले, तसेच काही जणांना डोकेदुखीचा त्रास सुरू झाला व चष्मा लागला. यामुळे पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून...
- संगणक स्क्रीनवर अँटिग्लेअर ग्लास बसवावेत.
- पुस्तक, संगणक उजेडात ठेवावे.
- जास्तीत जास्त फळांचे सेवन करावे.
- अँटिग्लेअर चष्मा वापरावा.
- प्रत्येक तासिकेनंतर डोळे बंद ठेवून थोडा वेळ आराम करावा.
- पुस्तक १२ ते १५ इंच लांब ठेवावे.
लहान मुलांमध्ये डोकेदुखी वाढली
ऑनलाइन तासिका करण्यासाठी विद्यार्थी एका जागेवर बसून शिक्षण घेत आहेत. यातच सतत मोबाइलसमोर बसून डोळ्यांना ताण येत आहे. याचा परिणाम मेंदूवरसुद्धा होतो. यामुळे नेहमी डोके दुखत असल्याचे काही विद्यार्थी पालकांना सांगत आहेत. यामुळे लहान मुलांना डोळ्यांच्या तपासणीसाठी नेल्यावर त्यांना चष्मा लागल्याचे डॉक्टर सांगत आहेत.
लहान मुलांना हा धोका
अति मोबाइल वापराने स्मरणशक्ती चांगली राहत नाही.
मोबाइलच्या अति वापरामुळे डोळे कोरडे होतात.
एकाच जागी बसून शिक्षण घेत असल्याने स्थूलता वाढत आहे.
पालकही चिंतेत
शाळा नसल्याने दररोज मुलांना ऑनलाइन वर्ग करण्यासाठी त्यांच्या मागे लागावे लागते. यातच मोबाइलचा वापर ऑनलाइन वर्ग झाल्यावरही केला जात आहे. मुले मोबाइलवर गेम खेळत आहेत व व्हिडिओ पाहत आहेत. यामुळे डोळ्यांना त्रास होत आहे.
-आरती वाघ, पालक
हातात मोबाइल घेतल्यावर मुले काय करत आहेत, हे अधूनमधून पाहावे लागत आहे. मोबाइलच्या वापरात मुले तहान-भूक विसरत आहेत. यामुळे जेवण करण्यासाठी त्यांच्या मागे लागावे लागत आहे. यातच अति मोबाइल वापराने डोकेदुखीचा त्रास होत असल्याने चिंता वाढली आहे.
-राधा प्रभाकर जाधव, पालक
पालकांनी कमीत कमी वेळ मुलांच्या हाती मोबाइल द्यावा. विद्यार्थ्यांनी केवळ ऑनलाइन वर्गासाठीच मोबाइल हाती घ्यावा. मोबाइलच्या अति वापरामुळे डोळे कोरडे पडत आहेत, तसेच डोळ्यांचा नंबर वाढत आहे.
-डाॅ. किशन नाईक, विभागप्रमुख, नेत्र रुग्णालय