बैलगाडीवर दुचाकी आदळून एकजण ठार, दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 18:03 IST2020-12-12T18:03:39+5:302020-12-12T18:03:58+5:30
रत्नापूर येथील पुलाशेजारून पांदण रस्त्यातून अचानक एक बैलगाडी रस्त्यावर आली.

बैलगाडीवर दुचाकी आदळून एकजण ठार, दोघे जखमी
मानवत: राष्ट्रीय महामार्ग 61 वर रत्नापूर जवळ दुचाकी बैलगाडीवर धडकून झालेल्या अपघातात एकजण ठार झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात 11 डिसेंबर रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील बुद्धनगर येथील रहिवासी सारीपुत रावण धबडगे ( 37 ), राहुल अंभोरे ( 28 ) आणि दत्ता गायकवाड ( 45 ) हे नळ फिटिंगचे काम करतात. ११ डिसेंबरला तिघे कामानिमित्त पाथरी येथे गेले होते. दिवसभर काम करून तिघेही एकाच दुचाकीवर सायंकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान परत मानवतकडे निघाले. रत्नापूर येथील पुलाशेजारून पांदण रस्त्यातून अचानक एक बैलगाडी रस्त्यावर आली. काही कळण्याच्या आत दुचाकी बैलगाडीवर जाऊन आदळली.
यात दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकार्यांनी सारीपुत रावण धबडगे यास तपासून मृत घोषित केले. राहुल अंभोरे आणि दत्ता गायकवाड यांच्यावर प्राथमिक उपचार करून परभणी येथे अधिक उपचारासाठी रवाना केले. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास पोलीस करत आहेत.